Hetawane Dam Pudhari
रायगड

Hetawane Dam: हेटवणे प्रकल्पामुळे आदिवासी जलस्रोत कोरडे; विवेक पंडितांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

पेण तालुक्यातील 12 गावांना पाणीटंचाईचा फटका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी हेटवणे धरणातून जलबोगदा खोदण्याचे काम सुरू असताना, पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत पूर्णपणे उद्धस्त झाले आहेत, या बाबत दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्ताची तातडीने दखल घेऊन, या गंभीर समस्येकडे राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास या भागातील जमीन कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हेटवणे प्रकल्पांतर्गत टनेल बोअरिंग मशीनद्वारे बोगद्याचे खोदकाम केले जात आहे. या प्रक्रियेत डोंगराखालील नैसर्गिक जलस्त्रोत कापले गेल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल्स आणि नैसर्गिक तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली असून कंत्राटदार कंपन्यांकडून केला जाणारा टँकरचा पुरवठा अत्यंत अपुरा असल्याचे समोर आले असल्याचे त्यानी पत्रात नमूद केले आहे.

या प्रकल्पाचा फटका पेण परिसरातील सुमारे 12 गावे आणि आदिवासी वाड्यांना बसला आहे. एकीकडे शहरांची तहान भागवण्यासाठी प्रकल्प राबवले जात असताना, ज्यांच्या जमिनीतून हे प्रकल्प जातात त्या आदिवासींना पाण्यासाठी तडफडावे लागणे ही बाब क्लेशदायक आहे, असेहीविवेक पंडित यांनी म्हटले आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या भागाचा दौरा करून वस्तुस्थितीचा पंचनामा करावा,जोपर्यंत नैसर्गिक स्त्रोत पुन्हा सुरू होत नाहीत, तोपर्यंत प्रशासनाने पुरेसा पाणीपुरवठा करावा,

जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवण्याकरिता तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी, विकास प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा मागण्या नमूद करुन, या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी विनंती विवेक पंडीत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.

आदिवासी विभाग अपर आयुक्तांना आदेश

जिल्हाधिकारी रायगड व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांच्याकडून या बाबतचा अहवाल तातडीने प्राप्त करून द्यावा तसेच प्रकल्प अधिकारी पेण यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन मला अहवाल देण्याते आदेश आपण अपर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांना दिले असल्याचे विवेक पंडीत यांनी पुढारीशी बोलताना सांगीतले. तसेच पहाणी करिता विशेष पथक सोमवारी पाठवित असल्याचे त्यांनी अखेरीस सांगीतले.

SCROLL FOR NEXT