cattle shed collapse Morsade sade file photo
रायगड

Raigad Rain updates: मुसळधार पावसाने सडे येथे गुरांचा वाडा कोसळला; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raigad Rain updates

पोलादपूर: रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पोलादपूर तालुक्यातील मोरसडे ग्रामपंचायतीअंतर्गत सडे येथे आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास गुरांचा वाडा कोसळून मोठे नुकसान झाले.

संतोष सुंदर साळेकर यांच्या गुरांच्या वाड्याची एक बाजू अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाड्यामध्ये असलेल्या चार गायींना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र वाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गुरांसाठी साठवून ठेवलेला पेंढा व वैरण पावसाच्या पाण्यात पूर्णपणे भिजली आहे.

सततच्या पावसामुळे भिंत अचानक कोसळल्याने वाडा राहण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने सर्व गुरांचे तातडीने दुसऱ्या सुरक्षित वाड्यात स्थलांतर करण्यात आले. पाऊस अद्यापही सुरू असल्याने आणखी भिंती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना बसत असून, पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या दुर्घटनेमुळे संतोष साळेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गुरांसाठी वर्षभराकरीता साठवून ठेवलेली पेंढ्याची वैरण पूर्णपणे भिजल्याने आता गुरांचा चारा कुठून आणायचा? असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. आधीच शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, तसेच सततच्या पावसामुळे धोकादायक स्थितीत असलेल्या जुन्या वाड्यांची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT