

राजगुरुनगर : खेड तालुक्यात मुसळधार पावसाने प्रचंड दाणादाण उडवली असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुळापूर ते मरकळ आणि आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने जवळपास ९७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी घर आणि भिंती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाशेरे येथे यशवंत जिजाबा कुडेकर यांच्या घराची भिंत कोसळली, तर वरुडे येथील बाळासाहेब दत्तात्रेय तांबे यांचे कौलारू घर कोसळले. वाडा येथील वाडेकरवाडी येथेही लहू विष्णू वाडेकर यांच्या घराची भिंत कोसळली आहे. या सर्व दुर्घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महसूल विभागाचे अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय कनेरसर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेची भिंत आणि करंजविहिरे येथील आरोग्य केंद्राची संरक्षक भिंतही कोसळली आहे.
पुराच्या पाण्यात नागरिक वाहून गेल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. रेटवडी येथील सत्तार वस्तीजवळील ओढ्याला आलेल्या पुरात समीर जाधव हा मुलगा वाहून गेला असून, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच शेलू-कुरकुंडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह पुरात वाहून गेली. त्याची दुचाकी पाण्याच्या मोरीमध्ये अडकलेली सापडली असली, तरी ती व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.
पावसामुळे तालुक्यातील अंतर्गत वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. लिंभोरे वस्ती आणि आसखेड खुर्द गावठाण पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. कनेरसर गावठाणला जोडणारा पूलही पाण्याखाली गेला असून, वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. जुन्या खेड घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गोलेगाव-पिंपळगाववरून वडगाव शिंदे पुलावर जाणारी वाहतूक आणि येलवाडी ते सांगूर्डी गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने बंद करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे आळंदी ते चाकण, आळंदी ते दिघी आणि इतर दोन मुख्य पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वराळे येथील भरत गोपाजी टाव्हरे यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने संसाराचे मोठे नुकसान झाले आहे.