Raigad Rain Update Pudhari
रायगड

Raigad Rain Update : धाटाव परिसरात पावसाचा हाहाकार; औद्योगिक परिसरातील रस्त्यांसह भातशेती पाण्याखाली

कुंडलिका नदीला पूर, शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Raigad Rain Update

धाटाव, विनोद जंगम : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्‍ह्यातील धाटाव दशक्रोशीसह संपूर्ण रोहा परिसरात मुसळधार पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. भातशेतीसह रोहा-कोलाड रस्त्यालगत असणारी दुकाने व घरे तसेच धाटाव औद्योगिक परिसरातील काही कारखान्यांसमोरील रस्ते संपूर्ण पाण्याखाली गेले आहेत. तसेच या भागातील संपूर्ण भातशेतीसुद्धा पाण्याखाली गेली आहे.

भातरोपे कुजण्याची भीती

उशिराने भातपेरणी करून आता कुठे रोपे तयार झालेली दिसून येत होती; परंतु या पावसाच्या पुरामुळे भातरोपे कुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे जीवनवाहिनी कुंडलिका नदीला तसेच रोठ खुर्दची उपनदी गंगेला पूर आला असून संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Raigad Rain Update

ग्रामस्थांच्या घरात घुसले पुराचे पाणी

धाटाव, किल्ला, वरसे, रोठ खुर्द येथील काही ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झालेले आहे. तसेच वरसे येथील स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेलेली दिसत आहे. या भागातील सर्वात उंच उडदवणे येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कुंडलिका नदीने रुद्ररूप धारण केल्याने येथील ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. असाच पाऊस अजून बरसत राहिला तर या भागातील अजून काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घरे, दुकाने, शाळा, कॉलेज, कारखाने परिसर पाण्याखाली

धाटाव, विष्णूनगर, किल्ला, वाशी, महादेववाडी, मळखंडवाडी, लांढर, उडदवणे, तळाघर, बोरघर, रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, वरसे, निवी या भागातील संपूर्ण खलाटी पाण्याखाली गेलेली दिसून येत आहे. धाटाव दशक्रोशी संपूर्ण रोहा भागात पावसाने हाहाकार माजविल्याने येथे पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील सर्व परिसर जलमय झालेला आहे. यावर्षी पाऊस सुरू झाल्यापासून प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे. परंतु रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथील उपनदी गंगा नदी व कुंडलिका नदीनेही रुद्ररूप धारण करीत धोक्याची पातळी ओलांडून येथील घरे, दुकाने, शाळा, कॉलेज, कारखाने परिसर पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहेत.

अनेक गावांचा संपर्क तुटला

अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेले दोन दिवस सतत मुसळधार पडत असलेला मुसळधार पावसामुळे त्यामध्ये डोंगरमाथ्यावरून धो-धो वाहत नाल्यांमधून येणारे पाणी तसेच धाटाव ते निवी भागातील कालव्याने दुथडी वाहून बारसोली, निधी येथील कालव्यातील पाणीपातळी ओलांडली आहे. त्यामुळे धाटावसह या भागातील शेतीचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. या परिसरातील जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून पूर आला आहे. तसेच रोठ खुर्दची उपनदी गंगेलाही पूर आला आहे. या परिसरातील रोठ खुर्द गावातील श्री भवानी मंदिर तसेच गावातील घरांजवळ मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

धाटावसह रोहा शहरात पूर

वरसे येथील सदासहयोग कॉलनी, आदर्शनगर, गणेशनगर, सुयोग कॉलनी येथील अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे दिसून आलेले आहेत. रात्री रेकॉर्डब्रेक पाऊस बरसल्याने धाटावसह रोहा शहरात पूर आला आहे.तसेच धाटाव औद्योगिक परिसरात पाणीच पाणी झाल्याने ड्युटीवर ये-जा करणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांना, तसेच रोहा शहरामध्ये आलेल्या सर्व नागरिकांना मोठा त्रास झाला. धाटाव येथील छोटेखानी बाजारपेठेतील दुकाने व बाजूच्या घरांतून पाणी गेले आहे. खूपच पाण्याची पातळी वाढल्याने येथील व्यापाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. असाच पाऊस बरसत राहिला तर मोठ्या प्रमाणात धाटाव दशक्रोशीसह रोहा शहराचे मोठे नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT