In which month Alphonso mango Season 2026 does come?
रायगड : किशोर सूद
यावर्षी मोसमी पावसाचा मुक्काम वाढला आहे. या लांबलेल्या पावसाचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी बाजारात जाते; मात्र यावर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत हापूसची प्रतीक्षा करावी लागेल, असे आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.
या वर्षीही हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे यावर्षी खवय्यांना हापूस आंब्याची चव उशिराच चाखायला मिळणार आहे कोकणातील आंबा उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षांत महत्त्व वाढले आहे. मात्र, हाच हापूस आंबा सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे. अवेळी पाऊस, वाढते तापमान याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. हवामानातील बदलांचा परिणाम उत्पादनासह गुणवत्तेवरही होत आहे.
जमिनीमध्ये अजूनही ओलावा
ऑक्टोबरपासून पाऊस कमी होतो; मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीमध्ये बराच ओलावा आहे. यावर्षी आंबा उत्पादन उशिरा येण्याची शक्यता आहे. जास्त पावसामुळे आंबा पिकावर बुरशी येते. इतर कीटकांचे प्रमाण वाढते. तणांची वाढ झालेली असते. महत्त्वाचे म्हणजे झाडा पाण्याचा जो ताण आवश्यक असतो, तो पाण्याचा ताण न आल्याने मोहोर लवकर येत नाही, असे अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी सांगितले.
लांबलेल्या पावसामुळे कोकणातील आंब्याला येणाऱ्या मोहोरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार ते पाच वर्षांपासून आंबा उत्पादनावर हवामानाचा परिणाम होत आहे. या वर्षीही हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असून कोकणातील आंबा उत्पादकांसाठी ही चिंतेची बाब आहे.चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
दृष्टिक्षेपात कोकणातील आंबा पीक
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड
एकूण लागवड क्षेत्र हेक्टर मध्ये 1,61,000
रायगड - 15,000
सिंधुदुर्ग - 33,000
रत्नागिरी - 1,13,000
ठाणे व पालघर जिल्ह्यांतही मर्यादित प्रमाणात लागवड
एकूण वार्षिक उत्पादन : २ लाख ६० हजार मेट्रिक टन
हापूस आंब्याला विशेष स्थान व प्रसिद्धी - रत्नागिरी, देवगड व रायगड येथील हापूस जगप्रसिद्ध
निर्यात प्रमाण : २५ हजार
मेट्रिक टन हापूस दरवर्षी निर्यात
निर्यात देश : युरोपियन देश,
दुबई, सिंगापूर, मध्य आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया
पणन मंडळाच्या सुविधांमुळे निर्यात वाढीस चालना