Halwa jewellery Makar Sankranti Pudhari
रायगड

Halwa jewellery Makar Sankranti: मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांचा गोड ट्रेंड; बाजारपेठेत महिलांची खरेदीची लगबग

हलके, आकर्षक आणि परवडणारे दागिने; फोटोशूट, बोरन्हाण व पहिल्या संक्रांतीसाठी मोठी मागणी

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

मकर संक्रांतीचा सण म्हटला की तिळगुळाचा गोडवा आणि हलव्याच्या दागिन्यांची लगबग आलीच. सध्या बाजारपेठेत आणि महिला वर्गामध्ये हलव्याच्या दागिन्यांची मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे. अनोख्या व आकर्षक डिझाईन्स आणि विविध किमतीत हे दागिने उपलब्ध असल्याने महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

खास मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना विशेष पसंती आणि मागणी असते. हे दागिने म्हणजे केवळ अलंकार नसून पारंपरिक हस्तकलेचे उत्तम उदाहरण आहे. हाताने किंवा मशीनने अतिशय कौशल्याने बनवलेले हे दागिने वजनाने अत्यंत हलके असतात, ज्यामुळे ते परिधान करणे सोपे जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या तुलनेत हे अत्यंत स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडणारे आहेत.

सध्या बाजारपेठेत मंगळसूत्र, हार, बांगड्या, कानातले, नथ, बोरमाळ आणि पैंजण अशा विविध प्रकारात हे दागिने उपलब्ध आहेत. यामध्ये नैसर्गिक साहित्य साखर, लाख, रंग, काच आणि मण्यांचा कल्पक वापर केला जातो.

हलव्याचे दागिने हे फोटोशूट तसेच नवीन लग्न झालेल्या वधू वर यांची पहिली मकर संक्रांत आणि लहान मुलांच्या बोरन्हाण साठी हे दागिने वापरले जातात. लहान मुलांचे बोरन्हाणं हे जन्मल्यापासून ते वयाच्या पाच वर्षापर्यंत करतात.

यांसारख्या कार्यक्रमांसाठीही हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. हे दागिने ट्रेंडी लूकसाठी लोकप्रिय झाले आहेत. पारंपरिक फोटोशूट या दागिन्यांना विशेष पसंती दिली जात आहे.

काय आहेत किमती?

लहान मुलांचे दागिने: 300 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत (मागणीनुसार)

मोठ्यांचे दागिने: 900 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंत (गुणवत्तेनुसार)

दागिने घेताना ही काळजी घ्या!

या दागिन्यांबाबत माहिती देताना अलिबाग येथील विक्रेत्या अंकिता कल्पेश पाटील यांनी सांगितले की, ‌‘हे दागिने खाण्यायोग्य नसतात. यामध्ये प्लास्टिकच्या मण्यांवर साखरेचे कोटिंग केलेले असते. केवळ धागा आणि साखर वापरून बनवलेले काही विशिष्ट दागिनेच खाल्ले जाऊ शकतात. तसेच, साखरेचे कोटिंग असल्याने हे दागिने ओलावा किंवा हवेच्या संपर्कात आल्यास चीघळण्याची शक्यता असते. त्यामुळे ते हवाबंद डब्यात किंवा कोरड्या जागी ठेवणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT