Gateway Mandwa ferry service Close Pudhari
रायगड

Gateway Mandwa ferry service Close: मांडवा ते गेटवे जलवाहतूक 26 मेपासून राहणार बंद; पावसाळ्यात सुरक्षेसाठी उपाययोजना

मेरिटाईम बोर्डाचे कंपन्यांना आदेश

पुढारी वृत्तसेवा

रायगड: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा दरम्यान धावणाऱ्या प्रवासी फेरी सेवेला येत्या 26 मेपासून पावसाळी ब्रेक लागणार आहे. पावसाळी हंगामामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ही सेवा 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात समुद्रातील मोठ्या लाटा, वादळी वारे आणि खराब हवामान लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात अरबी समुद्र खवळत असल्याने प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे.

पीएनपी, मालदार, अजंठा या खासगी कंपन्यांच्या गेटवे-मांडवा मार्गावरील व गेट-वे ते एलिफंटा मार्गावरील फेरी बोटी 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान बंद राहणार आहेत. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारक आणि काही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच दिघी-आगरदांडा मार्गावरील जेट्टी वाहतूकही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबईकरांसाठी अलिबाग हे अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ मानले जाते. कमी वेळात, कमी खर्चात व समुद्रमार्गाच्या रोमांचक अनुभवामुळे गेटवे ते मांडवा फेरी सेवेला वर्षभर मोठी मागणी असते. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या काळात हजारो पर्यटक या मार्गाने अलिबाग, नागाव, काशिद, मुरुड यांसारख्या पर्यटनस्थळांकडे रवाना होतात. मात्र, आता पुढील तीन महिने ही सेवा बंद राहणार असल्याने पर्यटकांना रस्तेमार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे.

फेरी बंदीमुळे अलिबागचा प्रवास तुलनेने अधिक वेळखाऊ व खर्चिक होण्याची शक्यता आहे. मुंबईहून रस्तेमार्गाने अलिबाग गाठण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने अनेक पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही या बंदीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट चालक,दुकानदार व पर्यटनाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर जलवाहतुकीवर अवलंबून असतात.

रो-रोचे दर वाढणार?

मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारक आणि काही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच दिघी-आगरदांडा मार्गावरील जेट्टी वाहतूकही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अत्यंत वादळी वातावरणात ही सेवा बंद राहत असते. दरम्यान यावर्षी आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. बाराही महिने राहणारी रो-रो बोट सेवेचे दर वाढणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रो-रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भूर्दंड पडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT