

रायगड: रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या अष्टागर परिसरातील चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी, थळ, आवास आणि सासवणे या पुरातन गावांचा इतिहास आणि पौराणिक कथांचे संकलन करण्याची एका व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अष्टागराच्या या समृद्ध वारशाला हेरिटेज पर्यटन म्हणून शासन दरबारी दर्जा मिळवून देण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
याच मोहिमेचा एक भाग म्हणून आगामी 2026 च्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये नागाव आणि चौल येथे भव्य हेरिटेज पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या नियोजनासाठी चौल येथील ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिर येथे प्रमुख कार्यकर्ते आणि पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर नागाव येथील श्री भिमेश्वर मंदिरयेथे डॉ. मकरंद आठवले यांच्या नेतृत्वाखाली दुसरी बैठक संपन्न झाली.
चौल या पुरातन शहराचे ऐतिहासिक पावित्र्य जपून पर्यटनाला एक नवे आणि दर्जेदार वळण देण्यासाठी या बैठकांमध्ये धोरण निश्चित करण्यात आले. यावेळी संजय यादवराव बोलत होते.
ऐतिहासिक दस्तऐवजीकरण
काळाच्या ओघात अष्टागर परिसरातील अनेक ऐतिहासिक दाखले आणि पुरावे नष्ट झाले आहेत. हे सर्व पुरावे, शिलालेख आणि संदर्भ एकत्र करून एक अधिकृत दस्तऐवज (डॉक्युमेंटेशन) तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
अलिबागचे माजी सरकारी वकील व पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक ॲड. विलास नाईक यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून या माहितीचे संकलन व प्रसार सुरू केला असून, इतिहासप्रेमींना माहिती व पुरावे देण्याचे आवाहन केले आहे. या कार्यात शिवप्रतिष्ठानच्या वतीने संजय यादवराव यांनीही सक्रिय सहकार्य जाहीर केले आहे.