Mumbai Goa Highway Alternative Route Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway traffic: गणेशोत्सवात महामार्ग कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते?, पेण ते पोलादपूरमधील रस्त्यांची यादी

पेण ते पोलादपूरदरम्यान वाहतूक ठप्प झाल्यास ‘डायव्हर्जन’; रायगड पोलिसांचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway Alternative Route

अलिबाग : रमेश कांबळे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गणेशभक्तांची वाढणारी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ तसेच अपघात अथवा अन्य कारणांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास ती अधिक तीव्र होऊ नये, यासाठी रायगड पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. पेण ते पोलादपूरदरम्यान विविध ठिकाणी ‘डायव्हर्शन पॉइंट’ निश्चित करण्यात आले असून, कोंडी झाल्यास वाहनचालकांनी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेणमध्ये वाहतूक कोंडी झाल्यास पर्याय मार्ग कोणते?

पेण परिसरात कोंडी झाल्यास वडखळकडून पेण बायपास, गागोदे, वर्सई, पाली फाटा, पाली, जांभुळपाडा मार्गे वाकण असा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे.

वडखळला वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग कोणते?

वडखळ येथे वाहतूक कोंडी झाल्यास वडखळ-पोयनाड-पेझारी चौक-कुर्डूस-नागोठणे-वाकण या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.

नागोठण्यात वाहतूक ठप्प झाल्यास पर्याय मार्ग कोणता?

नागोठणे येथे वाहतूक ठप्प झाल्यास नागोठणे-वेलशेत फाटा-वरवठणे-भिसेभिंग-वाकण किंवा नागोठणे-वेलशेत फाटा-वरवठणे-भिसेभिंग-रोहा-कोलाड या मार्गांचा वापर करता येणार आहे.

वाकणला पर्याय मार्ग कोणता?

वाकण परिसरात कोंडी झाल्यास वाकण-पाली-नांदगाव-विळे-सुतारवाडी-कोलाड, वाकण-पाली-नांदगाव-विळे-निजामपूर-माणगाव तसेच वाकण-पाली- नांदगाव-विळे-निजामपूर-माल्याचीवाडी-बोरवाडी-जांभुळवाडी- ढलघरफाटा या मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोलाडसाठी पर्याय मार्ग कोणता?

कोलाड येथे कोंडी झाल्यास कोलाड-सुतारवाडी-विळे- निजामपूर-माणगाव हा मार्ग पर्याय म्हणून वापरता येणार आहे.

माणगावला वाहतूक कोंडी असल्यास कोणत्या मार्गाने जाता येईल?

माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्यास माणगाव-मोर्बानाका-मोर्बा गाव-दहिवली-गोरगाव-लोणेरे या मार्गाचा वापर करता येईल.

लोणेरे फाटा येथे वाहतूक कोंडी झाल्यास पर्याय मार्ग कोणता?

लोणेरे फाटा परिसरात वाहतूक ठप्प झाल्यास लोणेरे-गोरगाव-नांदवी-आंबेत-म्हसळ या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. तर राजेवाडी फाट्यापुढे पोलादपूरच्या दिशेने कोंडी निर्माण झाल्यास टोकफाटा-आंबेत-म्हसळ हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे. त्‍यामुळे वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग मिळणार आहे.

सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. कोंडीच्या ठिकाणी वाहनचालकांनी अनावश्यकपणे वाहने थांबवू नयेत. पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT