Kalamboli Belapur Traffic Jam Pudhari
रायगड

Kalamboli Belapur Traffic Jam: गणेशभक्तांच्या परतीने महामार्ग जाम! कळंबोली ते बेलापूर वाहनांच्या लांबच लांब रांगा

गणेशभक्तांच्या परतीमुळे सायन-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कळंबोली ते बेलापूरदरम्यान वाहनांच्या लांब रांगा.

पुढारी वृत्तसेवा

विक्रम बाबर

पनवेल: अनंत चतुर्दशीला गणरायांना निरोप दिल्यानंतर मुंबईच्या दिशेने निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनांनी शनिवारी सायन-पनवेल महामार्ग अक्षरशः जाम केला. सकाळपासून वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याने कळंबोली ते खारघर, बेलापूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

काही ठिकाणी तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग पोहोचली. कळंबोली सर्कल ते टी पॉइंटदरम्यान तर वाहतुकीचा वेग इतका मंदावला की वाहनचालकांना अक्षरशः रांगत पुढे जावे लागले.

पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कळंबोली परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कळंबोली सर्कल ते टी पॉइंटदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

पनवेल, जेएनपीटी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि सायन-पनवेल महामार्गाला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याने कोंडीचा फटका दूरपर्यंत जाणवला. बेलापूरकडून पनवेलकडे येणाऱ्या आणि पनवेलकडून

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नेहमीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक वेळ प्रवासात घालवावा लागला. अनेक वाहनचालकांना मार्गावरच बराच काळ खोळंबून राहावे लागले.

कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध ठिकाणी प्रयत्न सुरू असून, महामार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमधील हजारो नागरिक कोकण आणि इतर भागांत गेले होते. शुक्रवारी दहा दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यानंतर शनिवारी सकाळपासून या गणेशभक्तांनी मुंबईच्या दिशेने परतीचा मार्ग धरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT