Rice Plantation News Pudhari
रायगड

Rice Plantation News: जर्मनीचा ॲलेक्स, पोर्तुगालची लिली उतरली थेट चिखलात! विदेशी तरुणांना मोहिनी घातली रायगडच्या भातलावणीने!

जागतिक पातळीवर शाश्वत शेती (पर्माकल्चर) आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत वाढत असलेल्या आकर्षणामुळे हे दोघे भारतात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

शरद निकुंभ

रायगड: पावसात चिखलाने भरलेले भाताचे खाचर... हातात भाताची रोपे... आणि त्यात उत्साहाने लावणी करणारे दोन गोरे परदेशी तरुण! सुधागड तालुक्यातील उद्धर गावात हे चित्र पाहून ग्रामस्थही काही क्षण थक्क झाले.

जर्मनीचा ॲलेक्स आणि पोर्तुगालची लिली या दोन तरुणांनी भारतीय शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी थेट भाताच्या खाचरात उतरून लावणी केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जागतिक पातळीवर शाश्वत शेती (पर्माकल्चर) आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत वाढत असलेल्या आकर्षणामुळे हे दोघे भारतात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धर येथील आत्मतृप्ती पर्माकल्चर'चे संचालक तुषार केळकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सात दिवसांच्या अभ्यासासाठी उद्धरची निवड केली.

भातलावणीच्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांसोबत काम करताना ॲलेक्स आणि लिली यांनी चिखलाची किंवा कष्टाची कोणतीही तमा बाळगली नाही. उलट शेतकऱ्यांकडून लावणीची पद्धत शिकत त्यांनी रोपे लावली. त्यांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक केले.

भातलावणीसोबतच ते सेंद्रिय शेती, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, जैवविविधता, ग्रामीण जीवनशैली आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचाही अभ्यास करत आहेत. गावातील पारंपरिक जेवण, ग्रामस्थांचे आत्मीय आदरातिथ्य आणि साधी जीवनशैली यांनी ते भारावून गेले आहेत.

तुषार केळकर म्हणाले, "परदेशातील अनेक युवक भारतातील पारंपरिक शेती आणि पर्माकल्चर शिकण्यासाठी उत्सुक आहेत. उद्धरमध्ये त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची असून, स्थानिक तरुणांनाही शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे."

विदेशी पाहुण्यांनी भातलावणीसाठी थेट चिखलात उतरल्याने उद्धर गावात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, 'रायगडची शेती आता थेट युरोपियन तरुणाईला खुणावत आहे,' अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली.

अन्न निर्मितीचा आनंद मिळाला

"आमच्या देशात अशी शेती पाहायला मिळत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून अन्न कसे तयार होते, हे प्रत्यक्ष अनुभवणे आमच्यासाठी खूप आनंददायी आणि शिकण्यासारखे आहे," अशी भावना या दोघांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT