Fake Gold Brick Scam pudhari photo
रायगड

Fake Gold Brick Scam : सोन्याची वीट निघाली बनावट; २० लाख घेऊन भामटे पसार

पनवेल परिसरातील थरारक घटना,आरोपींचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : दोन किलो बनावट सोन्याची वीट तब्बल २५ लाख रुपयांना विकून मालाड येथील ५८ वर्षीय व्यक्तीची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात गंगाराम व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे.

मालाड येथील पठाणवाडी, संजयनगर परिसरातील सपना सोसायटीमध्ये राहणारे ज्ञानेंद्र महेंद्र झा (वय ५८) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आरोपींनी जमीन खोदताना आपल्याला सोने सापडल्याची बतावणी करून झा यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांनी सोन्याचा एक तुकडाही झा यांना दिला. सदर तुकडा खरा असल्याची खात्री झाल्यानंतर झा यांचा आरोपींवरील विश्वास अधिकच वाढला.

यानंतर झा यांना पनवेल रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्थानकात झालेल्या भेटीत आरोपींनी आपल्याकडे दोन किलो सोन्याची वीट असल्याचे सांगितले. या सोन्याची किंमत २५ लाख रुपये असल्याचे सांगून ती झा यांना विकण्याचा व्यवहार निश्चित करण्यात आला.

सोन्याची वीट मिळणार असल्याने झा यांनी आरोपींवर विश्वास ठेवला. ९ ऑगस्ट रोजी सानपाडा रेल्वे स्थानकात आरोपींना २० लाख रुपये देण्यात आले. उर्वरित पाच लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. त्यानंतर झा यांनी सोन्याची वीट घरी नेली. मात्र, त्यानंतर सोन्याची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आले. आपली २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झा यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस उपनिरीक्षक मयुरी काळोखे या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी गंगाराम आणि त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असून, रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.

आरोपींनी सुरुवातीला सोन्याचा छोटा तुकडा देऊन तो खरा असल्याचे भासविले. त्यामुळे झा यांचा विश्वास बसला आणि त्यानंतर दोन किलो सोन्याची वीट देण्याच्या आमिषाला ते बळी पडले. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखविल्यास कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची अधिकृत तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

गुन्हा दाखल करण्यावरुन संभ्रम

या प्रकरणातील घटनाक्रम पनवेल, खांदेश्वर आणि सानपाडा रेल्वे स्थानकांशी संबंधित असल्याने सुरुवातीला गुन्हा कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल करायचा, यावरून काही काळ संभ्रम निर्माण झाला. अखेर आर्थिक व्यवहार सानपाडा पोलिसांच्या कक्षेत झाल्याचे कारण देत प्रकरण सानपाडा पोलिसांकडे दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT