Sharvika Mhatre 200 Forts Record  
रायगड

Sharvika Mhatre 200 Forts Record | सह्याद्रीच्या कडेकपारीत चिमुरड्या पावलांचा नवा इतिहास!

Sharvika Mhatre 200 Forts Record | अवघ्या आठ वर्षांच्या शर्विकाने सर केला २०० वा 'रांगणा' दुर्ग

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

जिद्द, अचाट धाडस आणि शिवकालीन इतिहासाविषयीची जाज्वल्य निष्ठा उराशी बाळगून सह्याद्रीचे कडेकपाटी पादाक्रांत करणाऱ्या अलिबाग जवळच्या लाेणारे गावातील अवघ्या आठ वर्षांच्या शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने एक नवा सुवर्णइतिहास रचला आहे. महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्विकाने नुकताच आपल्या दुर्गभ्रमंतीतील अत्यंत खडतर समजला जाणारा २०० वा दुर्ग सर करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि ऐतिहासिक महत्त्वाचा असलेला 'रांगणा किल्ला' हा शर्विकाच्या या अद्भूत प्रवासातील २०० वा किल्ला ठरला आहे. कधीकाळी वयाच्या अवघ्या अडीच वर्षांची असताना पहिला किल्ला 'रांगत रांगत' चढणारी सह्याद्रीची ही लाडकी लेक, आज प्रत्यक्ष 'रांगणा' गडावर भगवा फडकवून आली आहे. तिच्या या अचाट कामगिरीने संपूर्ण महाराष्ट्राचे मान-सन्मान आकाशासारखे उंच केले असून, तिचे हे यश शब्दांच्या पलीकडचे म्हणजेच निःशब्द करणारे आहे.

अडीच वर्षांच्या वयापासून सुरू झाला प्रवास

शर्विकाने वयाच्या अवघ्या अडीच वर्षांपासून आईअमृता आणि वडिल जितेन यांच्या सोबतीने सह्याद्रीच्या कुशीत पाऊल ठेवले. रांगायला शिकण्याच्या वयात तिने गड-किल्ल्यांची चढाई सुरू केली आणि केवळ सहा वर्षांच्या प्रत्यक्ष भटकंतीत तब्बल २०० दुर्ग सर करण्याचा थक्क करणारा टप्पा पार केला. यापूर्वी तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई, सर्वात उंच समजला जाणारा साल्हेर किल्ला, तसेच गुजरातमधील अतिशय दुर्गम व उंच असे गिरनार शिखरही लीलया सर केले आहे. विशेष म्हणजे, शर्विकाने आतापर्यंत सर केलेल्या सर्व २०० किल्ल्यांच्या पायथ्याची माती एका कलशात संग्रहित करून एक अनोखा ऐतिहासिक आणि भावनिक ठेवा जपला आहे.

छत्रपतींचे आशीर्वाद आणि मौनीबाबांच्या समाधीचे दर्शन

शर्विकाचा हा २०० वा दुर्ग प्रवास केवळ एक मोहीम नव्हती, तर ती एक भक्ती होती. या मोहिमेवर निघण्यापूर्वी शर्विकाने कोल्हापूरच्या ऐतिहासिक जुन्या राजवाड्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या तख्ताचे मनोभावे दर्शन घेतले. शिवरायांच्या दैनंदिन पूजेतील देवी-देवतांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कोल्हापूर राजघराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. रांगणा गडाच्या चढाईपूर्वी तिने शिवरायांचे गुरु मौनीबाबा यांच्या समाधीचे आणि भद्रकाली मातेच्या प्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन घनदाट जंगलातून आपली चढाई सुरू केली.

२०० व्या दुर्गासाठी 'रांगणा'चीच निवड का?

दोनशेव्या किल्ल्यासाठी रांगणा गडच का निवडला?" या प्रश्नावर आठ वर्षांच्या शर्विकाने दिलेले उत्तर तिच्यातील प्रगल्भ इतिहासअभ्यासाची साक्ष देणारेच ठरले आहे. शर्विका म्हणाली, छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत होते, तेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीत राजमाता जिजाऊसाहेबांनी हा गड जिंकून स्वराज्याला मोठा आधार दिला होता. तसेच, पुढे महाराणी ताराराणी यांनीही काही काळ या गडाला आपली राजधानी बनवले होते. अशा थोर रणरागिणींच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक गडावर जाऊनच मला २०० वा टप्पा पूर्ण करायचा होता, असे तीने सांगीतले.

१५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मान

शर्विकाच्या या धाडसाची दखल घेऊन तिला आजवर सामाजिक, पत्रकारिता, राजकीय, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील १५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शर्विकाचा विशेष गौरव करण्यात आला होता. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही शर्विकाच्या “हिरकणी निवास” या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिचे कौतुक केले आहे.

ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय

शर्विका केवळ डोंगर चढत नाही, तर ती आता पुणे येथे व्यावसायिक गिर्यारोहणाचे धडे घेत आहे. सध्या ती पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी शाळेत इयत्ता चाैथीमध्ये गेली आहे. त्याच बराेबर 'वॉल क्लाइंबिंग'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व दुर्ग सर करण्याचे तिचे स्वप्न तर आहेच; पण त्यासोबतच वॉल क्लाइंबिंग या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. अल्पवयात दुर्गप्रेम, इतिहासाची अफाट जाण आणि अदम्य जिद्दीच्या बळावर नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या या 'छोट्या हिरकणी' शर्विकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT