दिव्यांग चिमुकलीला सोडून पालक पळाले pudhari photo
रायगड

Child abandonment case : दिव्यांग चिमुकलीला सोडून पालक पळाले

पनवेल रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना समोर आली असून, तीन वर्षीय दिव्यांग चिमुकलीला आई-वडिलांनीच स्थानकावर बेवारस सोडून पळ काढल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, संबंधित पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एक लहानगी मुलगी एकटीच रडत बसलेली असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुणीतरी काही वेळासाठी मुलीला सोडून गेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र बराच वेळ उलटूनही कोणीच परत न आल्याने संशय बळावला. ही बाब तात्काळ रेल्वे पोलिस आणि स्थानक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

दरम्यान, स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, धक्कादायक सत्य समोर आले. संबंधित चिमुकलीला तिचे आई-वडीलच स्थानकावर आणून सोडून जात असल्याचे स्पष्टपणे फुटेजमध्ये कैद झाले आहे. काही वेळ मुलीसोबत थांबल्यानंतर दोघेही तिला एकटी सोडून निघून जाताना दिसतात. ही मुलगी दिव्यांग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पालकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. मुलीला सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात संरक्षणाखाली ठेवण्यात आले असून, तिच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT