आनंद सकपाळ
नेरळ: दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पर्यटन हंगामाच्या काळात माथेरानमध्ये निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी १८७६ साली बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक सिम्पसन टॅंकचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. माथेरानच्या उत्तर भागातील बंगले व स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी कॅप्टन सिम्पसन यांनी १८७६ साली हा जलसाठा उभारला होता.
त्या काळात या तलावाची साठवण क्षमता सुमारे ७६ हजार घनमीटर इतकी होती. १९०७ नंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या वाफेच्या इंजिनांसाठी अमनलॉज परिसरात याच तलावातील पाणी वापरले जात होते. जुम्मापट्टी, वॉटर पाईप आणि अमनलॉज या ठिकाणी रेल्वेसाठी पाणी भरण्याची व्यवस्था होती.
मात्र, गेल्या अनेक वर्षांत सिम्पसन टॅंकमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने तो पूर्णतः दुर्लक्षित झाला असून त्याची पाणी साठवण क्षमता जवळपास संपुष्टात आली आहे. सध्या माथेरान शहराच्या पिण्याच्या पाण्याची संपूर्ण जबाबदारी शारलोट तलावावर अवलंबून आहे.
१८५६ मध्ये उभारण्यात आलेल्या या तलावाची उंची नंतर वाढविण्यात आली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
माथेरान परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी पुरेशा जलसाठा व्यवस्थेअभावी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. तसेच वीजपुरवठा खंडित होणे व पंपिंग यंत्रणेमधील अडचणींमुळे कर्जत-नेरळ-कुंभे योजनेतील पाणीपुरवठाही वेळेत होत नसल्याची समस्या आहे.
भावी पिढीच्या वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता सिम्पसन टॅंकचा गाळ उपसा, दुरुस्ती आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेऊन त्याला पर्यायी जलसाठा म्हणून विकसित करावे. यासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी,- नितीन विश्वनाथ सावंत, सामाजिक कार्यकर्ते माथेरान