मुरुड जंजिरा : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला जंजिरा किल्ला हा देश- विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. प्रत्येक वर्षी 5 ते 6 लाख पर्यटक जंजिऱ्यावर भेट देत असतात.जंजिरा किल्ला हा राजपुरी गावात आहे.या किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगरी गावाला वळसा घालून जावे लागते.उंच अशा डोंगरातून हा मार्ग जातो.उजव्या बाजूस अथांग समुद्र असल्याने येथे सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी तसेच उंच डोंगरावरून निळाक्षार समुद्र व खोरा बंदर पहाण्यासाठी नेहमीच पर्यटकांची येथे गर्दी पहावयास मिळते.
पर्यटकांचे हे ठिकाण खूप आवडीचे असून येथे पर्यटकांना बसण्यासाठी बेंच व उंच असा चौथरा निर्माण करून एक आकर्षणाचे पर्यटन स्थळ विकसित होणार होते. गेली 7 वर्ष हा प्रकल्प वनखात्याच्या परवानगीसाठी अडकला आहे.7 वर्षांपूर्वी आमदार मीनाक्षीताई पाटील यांनी प्रस्ताव तयार करून 1 कोटी निधी मंजूर करून आणला परंतु ह्या परिसरात प्रकल्पातील काही जागा वनखात्याची निघाली आणि आलेला निधी व प्रकल्प अडकला तो अजूनही तासाचा आहे. यासाठी एक विशेष निधीची तरतूद शासनाकडून केल्यास पर्यटन विकासासाठी जचजक नियम शिथिल करून स्थानिक आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
मुरुड तालुक्याला पर्यटनाचा ब दर्जा प्राप्त आहे.यासाठी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी शासनाकडून निधी मिळणे खूप आवश्यक आहे. डोंगरी- राजपुरी रस्त्यावर सनसेट पॉइंट सुशोभिकरण केल्यास एकदरा, डोंगरी, माझेरी व राजपुरी येथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.जंजिरा किल्ला पहाण्यासाठी येणारा पर्यटक येथे थांबणार आहे.त्यामुळे राजपुरी ला सुमारे 250 लोकांना स्वयंरोजगार मिळाला आहे.त्या प्रमाणे येथील स्थानिकांना सुद्धा रोजगार मिळणार आहे.
मुळात हा पाँईट उंच माथ्यावर असुन इथून सूर्यास्ताचा देखावा अप्रतिम दिसतो. किल्ल्यावर जातांना वा परत येतांना या पॉईंटचा विकास केल्यास हमखास पर्यटक इथे क्षणभर विसावणार आहेत. पर्यटकांनी विश्रांती घेतली कि स्वयंरोजगाराला आपोआप चालना मिळणार आहे.पाववडा, भेळपुरी, आईसस्क्रीम पार्लर, नारळ पाणी, मक्याची कणसं, सी फूड स्टॉल्स, शाकाहारी- मांसाहारी खाणावळ आदी व्यवसाय चांगला रोजगार मिळवुन देऊ शकणार आहे.
या पॉईंटच्या विकासासाठी रस्ता 7 मीटर, रस्त्या पासुन एक फूट उंचीची संरक्षक भिंत, सेफ्टी गटर, रेलींग,4 स्वच्छता गृहे,15 /20 गाड्यांसाठी वाहनतळ, हाय मास्ट दिवे, गार्डन आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात या पॉईंटच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडले.सदरचा निधी व वनखात्याची परवानगीप्राप्त होण्यासाठी लोकप्रनिधी यांचे पर्यटन तोकडे पडले त्यामुळे या स्थळाचा विकास होणे कठीण होऊन बसले आहे. मुरुडच्या पर्यटनवाढीसाठी असे दर्शनीय भाग विकसित केले पाहिजेत. जेणे करून मुरुड सारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक अधिक काळ व्यतीत करतील आणि त्या योगे स्थानिकांच्या रोजगाराला हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यटन व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढु घातलेला व्यवसाय आहे. पर्यटनस्थळी असे विशिष्ट पॉईंटस विकसित केल्यास निश्चितपणे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळू शकते असा विश्वास वाटतो.आमदार महेंद्र दळवी यांनी या कामी पुढाकार घ्यावा अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.डोंगरी सनसेट पाँईट माथेरान महाबळेश्वरच्या धर्तीवर डेव्हलप झाल्यास अनेक पर्यटक या पाँईटवर विसावतील त्यामुळे पर्यटन वृद्धी व स्वयंरोजगाराला सुद्धा चालना मिळणार आहे.