

पाली : शरद निकुंभ
सुधागड तालुकातील ग्रामीण भागात यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. हिवाळ्यानंतर अचानक वाढलेले तापमान, कधी ढगाळ वातावरण तर कधी अनपेक्षित वारे व आद्रतेतील चढउतार यामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात करपल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे. यंदा मोहर चांगल्या प्रमाणात आल्याने उत्पादन भरघोस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र हवामानातील सततच्या बदलांनी ही आशा फोल ठरली आहे.
मोहर जळाल्याने अनेक बागांमध्ये फळधारणा थांबली असून काही ठिकाणी तर झाडांवर फळांची गाठही बसलेली नाही. परिणामी संपूर्ण हंगामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच वाढलेले खत, औषधे, मजुरी व देखभाल खर्च आणि त्यातच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कर्ज काढून बागांची निगा राखणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसमोर आता कर्जफेडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने काही ठिकाणी प्राथमिक पाहणी केली असली तरी ती अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. केवळ पाहणी करून प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष नुकसानग्रस्त आंबा बागांचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिक विमा योजना तसेच आपत्ती सहाय्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी शेतकरी संघटना आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील अनेक गावांत शेतकरी एकत्र येत या विषयावर आवाज उठवत असून, वेळेत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोहर करपल्याने उत्पादनात होणारी घट ही थेट बाजारपेठेवरही परिणाम करणारी ठरणार असून, त्याचे दुष्परिणाम पुढील महिन्यांत स्पष्टपणे जाणवतील, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने सर्व बागांची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत व अहवाल त्वरित शासनाकडे सादर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक तीव्र होतील, असा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात येत आहे.
हवामान बदलामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती ठोस कारवाई करावी.
रसिका फाटक, युवा शेतकरी पुरस्कार विजेती