शरद निकुंभ
रायगड: जून महिना अर्ध्याहून अधिक संपत आला तरी अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतीसह पिण्याचे पाणी आणि पशुधन व्यवस्थापनाचे प्रश्न गंभीर बनले आहेत. वाढत्या उन्हामुळे विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असून अनेक गावांमध्ये भविष्यातील पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा मान्सूनच्या आगमनानंतर दमदार पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी भातशेतीच्या कामांना मोठा फटका बसत आहे.
शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच भात रोपवाटिका तयार केल्या होत्या. अनेक ठिकाणी रोपे उगवली; मात्र सततच्या उष्णतेमुळे आणि पाण्याअभावी ही रोपे पिवळी पडू लागली आहेत. काही भागांत रोपांची वाढ खुंटली असून रोपवाटिकांना कृत्रिम पाणीपुरवठा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भात लावणीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा नसल्याने पेरणी आणि लावणीची कामे रखडली आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. मे महिन्याच्या अखेरीस ज्या विहिरी अर्ध्यापर्यंत भरलेल्या होत्या, त्यामधील पाणी आता लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. काही विहिरींचा तळ दिसू लागला असून कूपनलिकांच्या पाण्याचाही विसर्ग कमी होत आहे. पावसाअभावी भूजलसाठ्यांची पुनर्भरण प्रक्रिया थांबल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांमध्ये नागरिकांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. काही ठिकाणी सकाळी आणि सायंकाळीच पाणी उपलब्ध होत असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास टँकरची गरज निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिरव्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कठीण बनत आहे. तलाव, ओढे आणि लहान जलस्रोत कोरडे पडू लागल्याने गुरांना दूरवर नेण्याची वेळ येत आहे. चारा आणि पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी शेतकरी वर्ग चिंतेत आहे. वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाला तर भातशेतीला दिलासा मिळेल. अन्यथा यंदाच्या खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी अनेक प्रश्न
चिंता वाढवणारी परिस्थिती
विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे
भात रोपवाटिकांतील रोपे पिवळी पडू लागली
भात पेरणी व लावणीची कामे रखडली
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता
जनावरांसाठी पाणी व हिरव्या चाऱ्याचा तुटवडा
शेतकऱ्यांचे लक्ष दमदार पावसाकडे