Khalapur bridge collapse pudhari photo
रायगड

Raigad News : पावसाच्या प्रचंड प्रवाहात पूल खचला

खालापूर तालुक्यात तुकसई परिसरातील चार गावाचा संपर्क धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

खोपोली: खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील नदीवरील सुमारे ४५ ते ५० फूट लांबीचा जीर्ण व धोकादायक पूल बुधवारी सकाळी पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे खचला. पुलाच्या बाजूच्या संरक्षक भिंती, खांब तसेच तळभाग मोठ्या प्रमाणात खचले असून पुलाच्या संरचनेला मोठे तडे गेले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पुलाची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रुप ग्रामपंचायत तुकसईने जिल्हा परिषदेकडे अनेकदा पत्रव्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पुलाखालून जात होता. अखेर पाण्याचा वाढता प्रवाह आणि पुलाची जीर्ण अवस्था यामुळे पूल खचला.

या पुलावरून तुकसई गावासह तूरमाल ठाकूरवाडी, चिंबोडे ठाकूरवाडी आणि आदिवासी वाडीतील नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, कामगार, नोकरदार तसेच आठवडे बाजारासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग होता. पूल खचल्याने नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूचना करुनही दुरुस्ती नाही

तुकसई येथील हा पूल सुमारे तीस वर्षे जुना असून तो जीर्ण झाला होता. पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत अनेक ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला; मात्र नियोजित वेळेत काम न झाल्याने अखेर पूल खचला. पावसाळ्यामध्ये या मार्गावरून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे सातत्याने येथे असलेल्या खांबांना यांचा फटका बसत होता.अखेर आज सकाळी हा पूल खचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून दुरुस्तीसाठी आवश्यक निधी अपुरा पडल्याने काम रखडल्याचे सांगण्यात येते. . पूल खचल्यानंतर जिल्हा परिषद अभियंत्यांनी घटनास्थळी पाहणी केली.पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र वेळेत काम झालेले नाही.
गणेश मोरे, ग्रामसेवक, दुरशेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT