

डहाणू : विरेंद्र खाटा
डहाणूच्या किनाऱ्यावर मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्यानंतर समुद्राच्या अथांग विश्वात मुक्त झालेली ‘धवललक्ष्मी’ तब्बल २२८ दिवसांत ४ हजार ७८५ किलोमीटरचा थरारक प्रवास करून ओमानच्या सागरी हद्दीपर्यंत पोहोचली आणि पुन्हा भारताच्या किनाऱ्याकडे परतली. पालघरपासून गुजरात, द्वारका ओलांडत ओमानपर्यंत गेलेली ही समुद्रकन्या पुन्हा भारताच्या सागरी हद्दीत दाखल झाली; मात्र मुर्देश्वर किनाऱ्यापासून १२५ किलोमीटर अंतरावर पोहोचताच तिचा सॅटेलाइट सिग्नल अचानक बंद झाला. ५ जुलैला मिळालेला संदेश तिच्या प्रवासाचा अखेरचा ठाव ठरला असून, त्यानंतर धवललक्ष्मी नेमकी कुठे आहे, याचे गूढ कायम आहे.
झाले असे की, सन २०२५ मध्ये डहाणूच्या समुद्रात मासेमारीच्या जाळ्यात अडकून जखमी झालेली धवललक्ष्मी आढळली होती. तिची सुटका करून पारनाका येथील डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या देशातील पहिल्या सागरी कासव संक्रमण केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले. पुनर्वसनानंतर २० नोव्हेंबर २०२५ रोजी तिला पुन्हा डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आले.
समुद्रात सोडण्यापूर्वी तिच्या कवचावर सॅटेलाइट ट्रान्समीटर, तर फ्लिपरवर फ्लिपरटॅग बसविण्यात आला. पुनर्वसनानंतर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून सागरी कासवाला समुद्रात सोडण्याचा हा देशातील पहिला प्रयोग होता. टॅग लागल्यानंतर धवललक्ष्मीने पालघरच्या किनाऱ्यावरून गुजरात आणि दमणच्या दिशेने प्रवास केला. त्यानंतर द्वारकेहून पश्चिमेकडे जात ती ओमानच्या सागरी हद्दीत पोहोचली.
तेथून पुन्हा भारतीय सागरी हद्दीत परतल्यानंतर तिने पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समुद्रकिनारा पार केला. पुढे तिचा प्रवास गोव्याच्या दिशेने सुरू राहिला. अशा प्रकारे २२८ दिवसांत तब्बल ४,७८५ किलोमीटरची सागरी भ्रमंती करून तिने संशोधकांना ऑलिव्ह रिडले कासवाच्या समुद्री हालचालींचे अनोखे विश्व उलगडून दाखवले. ५ जुलै रोजी मुर्देश्वर किनाऱ्यापासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर असताना धवललक्ष्मीचा शेवटचा सॅटेलाइट संदेश मिळाला. त्यानंतर मात्र सिग्नल पूर्णपणे बंद झाला.
यामुळे वन्यजीव अभ्यासकांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी शेवटच्या उपलब्ध डायव्ह डेटामध्ये तिच्या हालचालींमध्ये कोणतेही असामान्य वर्तन आढळले नव्हते. त्यामुळे धवललक्ष्मी संकटात सापडल्याचा निष्कर्ष काढण्याचे कोणतेही ठोस कारण सध्या नाही. सिग्नल बंद म्हणजे धवललक्ष्मीचा प्रवास संपला, असे नाही. तिच्या शेवटच्या डायव्ह डेटामध्ये कोणतेही असामान्य वर्तन दिसून आले नसल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्यापेक्षा सॅटेलाइट टॅगमधील तांत्रिक बिघाड, बॅटरी संपणे किंवा टॅग नैसर्गिकरीत्या निघून जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
आता एकच प्रश्न... ‘धवललक्ष्मी’ पुन्हा दिसणार का?
धवललक्ष्मीचा सिग्नल बंद झाल्याने तिच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी तिची कहाणी अजून संपलेली नाही. तिचा सॅटेलाइट संपर्क पुन्हा प्रस्थापित होईल का? ती अजूनही अरबी समुद्रात सुरक्षितपणे भ्रमंती करत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंडी घालण्यासाठी ती पुन्हा डहाणूच्या किनाऱ्यावर परतेल का?