अलिबाग : सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्ह्यातील यंदा आंबा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थंडीमुळे आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, सध्या रायगड जिल्ह्यातील बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर डोकावू लागला आहे. आंब्यासाठी पोषक वातावरण कायम असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आंबा उत्पादनात 10 ते 20 टक्के वाढ अपेक्षित असल्याची शक्यता बागायतदार वर्तवित आहेत.
रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 42 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास 21 हजार 424 मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मात्र या उत्पादनात 10 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण कायम राहिल्याने, तसेच किडरोगाचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने आंबा उत्पादनात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्याची प्रक्रिया सुरू होत असते. या पालवीला डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोहर येतो. यंदा मोहर येण्याची प्रक्रिया वेळेत सुरू झाली आहे. एकूण उत्पादनक्षम क्षेत्रापैकी जवळपास 70 टक्के क्षेत्रावर मोहर आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत फळधारणेचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे.
लवकर मोहोर आल्याने कोकणातील आंबा मार्च महिन्यात वाशीच्या मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल. जून महिन्यापर्यंत मुबलक आंबा बाजारात असेल असा अंदाज आहे.
आंबा पिकासाठी पोषक वातावरण कायम असल्याने या वर्षी आंबा उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. सध्या कोकणातील आंबा कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल.संजय मोकल, आंबा बागायतदार