सततच्या हवामान बदलामुळे कोकणातील मच्छीमार आर्थिक संकटात pudhari photo
रायगड

Climate change impact fishing : सततच्या हवामान बदलामुळे कोकणातील मच्छीमार आर्थिक संकटात

विविध व्यवसायही डबघाईला; शासनाने तातडीने ‌‘विशेष मदत पॅकेज‌’ जाहीर करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : भारत चोगले

कोकणचा किनारी भागात एकामागोमाग एक वादळे, थैमान घालणारे वारे, उंचावलेली लाटा आणि संतप्त समुद्र या सगळ्यांनी कोकणातील मच्छिमार बांधवांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. या हवामान बदलामुळे मच्छीमारी ठप्प होत असून मच्छीमारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने मच्छीमारांना मदत जाहीर करावी अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.

अलीकडेच शक्ती चक्रीवादळ येऊन गेले. त्याच्या आधीही अनेक वादळांनी किनाऱ्याला झोडपून काढले. अनेक बोटी अजूनही किनाऱ्यावर अडकल्या आहेत. या हवामान रायगडातील भरडखोल, श्रीवर्धन, बागमांडला, मेंदडी, दिघी, जीवना बंदर, मुळगाव, वाशी, आगरदांडा, दिवेआगर, शेखाडी, कुडगाव या किनारी गावांतील मच्छिमार आज हतबल झाले आहेत. दरवर्षी 1 जून ते 31 जुलै या काळात मासेमारी बंदी असते, पण यंदा मे महिन्यापासूनच वादळे सुरू झाल्याने मच्छिमारी थांबली.

1 ऑगस्टला हंगाम सुरू झाला तरी निसर्गाने पुन्हा कोप दाखवला. त्यामुळे संपूर्ण हंगामच उध्वस्त झाल्यासारखा आहे. मासे नाहीत म्हणजे बर्फवाल्याचे दुकान बंद, रिक्षा-टेम्पोवाल्यांना वाहतूक नाही, हातगाडी वाल्यांना विक्री नाही, बाजारात दुकानदारांची उलाढाल थांबली, आणि स्त्रियांना विक्रीतून मिळणारा रोजंदारीचा पैसा नाही.एका मच्छिमाराचे जाळे थांबले की, त्याच्यासोबत अनेक घरांची चूल विझते.

आज किनाऱ्यांवर केवळ शांतता नाहीतर हताश, उपासमार आणि निराशेचे वातावरण आहे. डिझेल, बर्फ आणि अन्नसामुग्रीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मच्छिमार जगला तरच छोटे मोठे व्यावसायिक जगतील, आणि कोकणच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळेल. शासनाने या संकटाची दखल घेऊन तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करणे हीच आज किनाऱ्या वरच्या प्रत्येक मच्छिमाराची आर्त हाक आहे.

डिझेल, बर्फ आणि अन्नसामुग्रीच्या वाढत्या किमतींनी मच्छिमारांचा श्वास घुटमळू लागला आहे. बोटींची दुरुस्ती, कर्जफेड आणि बँक हप्त्यांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला मच्छीविक्रेत्या रोजंदारीशिवाय घर चालवत आहेत; अनेक कुटुंबे उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने आता संवेदनशीलतेने आणि तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

मच्छिमार बांधवांच्या प्रमुख मागण्या

  • डिझेल सवलत योजना तातडीने लागू करावी

  • जाळी व बोट दुरुस्ती अनुदान वाढवावे

  • थकलेली कर्जे माफ करावीत

  • आपत्ती निवारक निधीतून थेट रोखीची मदत द्यावी

  • मच्छिमारी बंद काळातील जीवनावश्यक भत्ता पुन्हा लागू करावा.

  • खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे या तिघांनी मिळून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोकणासाठी विशेष पॅकेज मिळवून द्यावे, एकमुखी मागणी रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी केली आहे.

मच्छिमार बांधवांची ठाम मागणी अशी आहे की, त्यांच्या थकित कर्जांची तात्काळ माफी करण्यात यावी. मच्छिमारांना इंधन, डिझेल, ऑईल आणि इतर मासेमारीसाठी लागणारी सामग्री कृषी दराप्रमाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसेच फिशरिज विद्यापीठाचे केंद्र श्रीवर्धन तालुक्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही पुढे आली आहे. शेतकरी बांधवांप्रमाणे मच्छिमार बांधवांनाही विशेष आर्थिक पॅकेज मिळावे, कारण समुद्र हा त्यांचा शेत असून जाळं हे त्यांचं नांगर आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ ठोस निर्णय घ्यावा.
पांडुरंग चौले, चेअरमन, आदिवासी कोळी मच्छिमार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT