raigad  
रायगड

Navi Mumbai Metro | नवी मुंबई मेट्रोचा मोठा विक्रम; दोन वर्षांत 1 कोटी 15 लाख प्रवासी

Navi Mumbai Metro | नवी मुंबईत सिडकोच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी भर घालणाऱ्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 1 ने सुरूवातीनंतर केवळ दोन वर्षांत प्रवासी संख्येत मोठा विक्रम नोंदवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai Metro

नवी मुंबईत सिडकोच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी भर घालणाऱ्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक १ (बेलापूर ते पेंधर) ने सुरूवातीनंतर केवळ दोन वर्षांत प्रवासी संख्येत मोठा विक्रम नोंदवला आहे. या कालावधीत एकूण १,१५,२८,२९७ प्रवाशांनी ही मेट्रो सेवा वापरल्याची अधिकृत माहिती सिडकोतर्फे देण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संपूर्ण मेट्रो टीमचे अभिनंदन करत नवी मुंबईकरांचेही मनापासून आभार मानले.

सिडकोने नवी मुंबईची वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने मेट्रो प्रकल्प राबवला. त्यानुसार बेलापूर ते पेंधर हा मार्ग विकसित करण्यात आला आणि 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो सेवेचे देशाला औपचारिक समर्पण करण्यात आले.

मेट्रो सुरू झाल्यापासून बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांना मोठी सोय झाली आहे. रोजच्या प्रवासात वेळ आणि खर्च दोन्ही वाचू लागल्याने या मार्गावर प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत गेली.

प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सिडकोने मेट्रो वेळापत्रक अधिक कार्यक्षम केले आहे. गर्दीच्या वेळी बेलापूर ते तळोजा या दोन्ही दिशांना दर 10 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असते.
गर्दी नसलेल्या वेळांत दर 15 मिनिटांनी फेऱ्या सुरू असतात.

तिकीट दरांमध्येही मोठी कपात करून किमान 10 रुपये तर कमाल 30 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. या दोन्ही सुधारणांमुळे सामान्य प्रवाशांना मेट्रो हा सोयीस्कर आणि परवडणारा पर्याय ठरला असून, प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ झाली.

एक कोटींचा टप्पा का महत्त्वाचा?

अवघ्या दोन वर्षांत 1 कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात, याचा अर्थ मेट्रो सेवेबद्दल प्रवाशांचा विश्वास सातत्याने वाढत आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर, खारघर, तळोजा, कामगार कार्यालये, उद्योग-व्यवसाय केंद्रे आणि गृहप्रकल्प या सर्वांना मेट्रोमुळे वेगवान, सुरक्षित आणि स्वस्त वाहतूक मिळू लागली आहे. त्यामुळे हा टप्पा नवी मुंबईच्या वाढत्या नागरी विकासाचाही पुरावा आहे.

थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सेवा

सिडकोने मेट्रोचा भविष्यातील आराखडा देखील जाहीर केला आहे.
मेट्रो मार्ग क्रमांक १ चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत केला जाणार आहे. तसेच १६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग क्रमांक २ पेंधर ते तळोजा MIDC दरम्यान विकसित केला जाणार असून कळंबोली आणि कामोठे मार्गे पुढे विमानतळापर्यंत हा मार्ग नेण्याची तयारी सुरू आहे. या विस्तारामुळे संपूर्ण नवी मुंबईला मेट्रोतून विमानतळाशी जोडणारी एक मजबूत वाहतूक लिंक मिळणार आहे.

आज नवी मुंबई आयटी कंपन्या, शिक्षण संस्था, हेल्थकेअर, रिअल इस्टेट आणि उद्योग क्षेत्र यामुळे मोठ्या वेगाने विकसित होत आहे. अशा वेळी मेट्रोसारखी वेळेवर चालणारी, सुरक्षित आणि परवडणारी सेवा शहराच्या प्रगतीला नवी चालना देते. 1 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठल्यामुळे आता सिडको मेट्रो नवी मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे, हे सिद्ध झाले आहे.

“मेट्रो सेवेने केवळ दोन वर्षांत गाठलेला एक कोटी प्रवाशांचा आकडा हा प्रवाशांच्या जबरदस्त प्रतिसादाचे द्योतक आहे. बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसराला ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. नवी मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.” त्यांच्या या वक्तव्यावरून सिडकोला भविष्यात मेट्रोचे अधिक मार्ग विकसित करण्याचा आत्मविश्वास मिळत असल्याचे दिसते.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT