

पोलादपूर (रायगड) : पोलादपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर सलग दुसर्यांदा सत्तेत आलेल्या शिवसेना पक्षाने आरक्षणानुसार अनेक नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची संधी दिली असून आता, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्याने, आगामी शिल्लक एक वर्षाच्या कालावधीकरिता शिवसेनेच्या अस्मिता पवार आणि स्नेहा मेहता यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली आहे. याकरिता नगराध्यक्ष निवड 25 नोव्हेेंबरला होणार आहे.
आगामी अखेरच्या एक वर्षात अस्मिता पवार आणि स्नेहा मेहता यांच्यापैकी कोणाची पहिल्या सहामाही कालावधीसाठी वर्णी लागेल, याबाबत पोलादपूरकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्ही नगरसेविकामध्ये त्यामुळे चुरस निर्माण झाली असून शिवसेना पक्षातर्फे प्रथम सहा महिन्यात कोणाला संधी दिली जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पोलादपूर नगराध्यक्षपद महिला राखीव झाल्यानंतर प्रथम सोनाली प्रकाश गायकवाड यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतरच्या काळात गायकवाड यांनी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदावर शिल्पा देवेंद्र दरेकर, अस्मिता उमेश पवार आणि स्नेहा सचिन मेहता यांनी दावा केला. त्यामुळे शिवसेना पक्षाने तीनही नगरसेविकांना उर्वरित दीड वर्षाच्या कालावधीत प्रत्येकी सहा महिन्यांसाठी नगराध्यपदाची संधी देण्याचा निर्णय घेत शिल्पा दरेकर यांना पहिल्या सहामाहीसाठी नगराध्यक्ष पदाची संधी दिली. त्यांचा कालावधी आता संपल्यानंतर त्यांचा राजिनामा रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे देण्यात आला.
पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र 18 नोव्हेंबर रोजी दाखल करायचे आहेते. याच दिवशी छाननी आणि उमेदवारी अर्ज फेटाळणे बाबतची जाहिर सूचना व कारणे प्रसिद्ध होईल. 19 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत निर्णयाविरोधात अपील करण्याचा कालावधी असून याचदिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. 20 नोव्हेंबरला अर्ज मागे मुदत आहे. याचदिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल.25 नोव्हेंबरला नगराध्यक्षपदी निवड प्रक्रिया होईल. महाड उपविभागीय महसूल अधिकारी पोपटराव ओमासे हे पिठासन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत.