Rice Plantation Season Pudhari
रायगड

Rice Plantation Season: पिढी बदलली तरी बालपण तेच-पाऊस, चिखलात मस्‍ती; ग्रामीण भागात अजूनही जिवंत आहे "मातीचं सुख"

मोबाईल बाजूला ठेऊन मातीत रमली मुले! रविवारच्या सुट्टीच्या दिवशी भात शेतात चिखलात मुलांची धमाल

पुढारी वृत्तसेवा

शरद निकुंभ

खाडीपट्टा: खाडीपट्टयात सध्या मुबलक पाऊस पडत असून भात लावणीचा हंगाम जोरदार सुरू आहे. त्यातच रविवार असल्याकारणाने शाळांना सुट्टी असल्यामुळे शालेय मुलांनी थेट मोबाईल बाजूला सारून शेत गाठून शेतामध्ये धमाल मस्ती करत आहेत. याचबरोबर शेतकरी बाबांना देखील भात लावणीमध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत.

असाच एक मनाला भावणारा क्षण अलीकडे खाडीपट्टयातील एका भात शेतात कॅमेऱ्यात कैद झाला. हातात पुस्तक नाही, हातात मोबाईल नाही. अंगावर चिखल, पायात बूट नाही, पण चेहऱ्यावर १०० वॅटचा आनंद. 4-5 मुलं एकमेकांना पाण्यात ढकलत आहेत, चिखल उडवत आहेत आणि मनसोक्त हसत आहेत.

आम्हाला शेतात काम करायला पण आवडतं आणि खेळायला पण. घरी बसून बोर होतो, म्हणून थेट शेतात येतो. असे एका मुलाने चिखलाने माखलेल्या हाताने हसत सांगितले. दुसऱ्या मुलाने सांगितले, सिटीतले मित्र गेम खेळतात, आम्ही चिखलात गेम खेळतो. यात जास्त मजा आहे. शहरांमध्ये मुले आता टॅब, गेम आणि AC मध्ये अडकली आहेत.

पण खाडीपट्टयातील गावांमध्ये अजूनही बालपण मातीशी जोडलेले आहे. भात लावणीच्या हंगामात सकाळी आई-वडिलांना मदत आणि दुपारी मित्रांसोबत चिखलात मस्ती - हेच येथील दिनक्रम सुट्टीचे झाले आहे.

समाजशास्त्रज्ञ डॉक्टर म्हणतात, "मातीत खेळल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सोबतच त्यांच्यात सांघिकपणा, मेहनतीची सवय आणि निसर्गाशी नाळ जुळते. हीच खरी संस्कृती आहे जी आपण जपली पाहिजे. खाडीपट्टयातील शेतकरी सांगतात, मुले लहानपणापासून शेतात आली की त्यांना पिकाची किंमत कळते.

एक घास अन्नामागे किती मेहनत आहे हे समजते. पाणी, बी, खते आणि कष्ट यातूनच अन्न धान्य तयार होते. मात्र सगळीकडे चित्र तसे नाही. इंटरनेट आणि रील्सच्या जमान्यात अनेक गावातील मुलेही आता मोबाईलमध्ये गुंतली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मातीत रमणारी मुले पाहून जुन्या पिढीला हायसं वाटते. 

यावेळी एक आजी म्हणाल्या, "आमच्या वेळी तर दिवसभर चिखलातच असायचो. आता नातवंडे पाहून वाटतं की चला, अजून आमची परंपरा जिवंत आहे." पावसाचा आवाज, बेडकांचा डराव, हिरवीगार भाताची रोपं आणि चिखलाचा स्पर्श - यापेक्षा मोठी शाळा कुठली? पुस्तकातून जे शिकता येत नाही ते निसर्ग थेट शिकवतो. पावसाचे दिवस, शेतातली लगबग आणि त्यात रमलेले बालपण - हेच तर कोकणाचे खरे वैभव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT