

प्रशांत गोपाळे
खोपोली: पराभवानंतर मी खचलेलो नाही. तसा शेकापही खचलेला नाही. रायगड जिल्ह्यात शेकाप संपला की संपवला हे भविष्यात दाखवून देवू असा इशारा जिल्हा चिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला आहे.
कामगार आणि कष्टकरी आणि युवक, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा संकल्प करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. खालापूर येथे आयोजित शेकापच्या वर्धापनदिन मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यास आ. रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार बाळाराम पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आरडीसी बँकेच्या संचालक सुप्रिया पाटील यांच्यासह जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत. शेकापक्षाचे ध्वजारोहण युवा नेत्या सौम्या कोरडे हिच्या हस्ते करण्यात आले.
शेकापक्ष चळवळीतील पक्ष असून आमची चौथी पिढी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्रलेखा पाटील यांचे नाव घेवून सांगितले. शेकापक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जबाबदारी खालापूर तालुक्यावर दिली त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्ते, महिलांनी गेली आठ दिवस मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रास्ताविकातून महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी बोलताना सांगितले. यावेळी शीतल गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला
शेकाप छोटा भाऊ
शेकाप हा इंडिया आघाडीतील महत्वाचा छोटा भाऊ आहे. या पक्षाला रायगड जिल्ह्यात ताकद देण्याचे काम करू असे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद असताना बॅरिस्टर अंतुले यांचा पराभव केला होता याचे स्मरण करून बॅरिस्टर अंतुले खुप चांगले नेते असल्याची आठवण सांगितले.