Raigad Shivrajyabhishek Sohla Pudhari
रायगड

Eknath Shinde | चंद्र-सूर्य असेपर्यंत शिवरायांचा सन्मान ; रायगड स्वाभिमानाचा कणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अडचणी दिल्लीतून दूर करण्याची मागणी; शिवसृष्टीसाठी वाढीव निधी देण्याची गोगावले यांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

Raigad Shivrajyabhishek Sohla

महाड : "चंद्र आणि सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा सन्मान कायम राहील," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्सव हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२७) उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले की, ३५३ वर्षांपूर्वी रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ राजकीय सोहळा नव्हता, तर स्वराज्य, स्वधर्म आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची ऐतिहासिक सुरुवात होती. रायगड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा कणा असून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठी राज्याला नवी दिशा दिली, असे त्यांनी सांगितले.

शिवरायांनी प्रजाहितदक्ष प्रशासन, न्यायव्यवस्था, आरमार आणि पर्यावरण संवर्धनाचे आदर्श घालून दिल्याचे नमूद करत त्यांनी केंद्र सरकारने भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींच्या राजमुद्रेचा समावेश केल्याची आठवण करून दिली. रायगडावरील विविध विकासकामांसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युनेस्कोने रायगडसह १२ मराठा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद केल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी रायगडावरील पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याची माहिती दिली. तसेच, शेतकरी हा राज्याचा अन्नदाता असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचाच असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसृष्टीसाठी वाढीव निधीची मागणी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मंत्री भरतशेठ गोगावले यांनी रायगडावरील राज्याभिषेक उत्सवाच्या ३० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानग्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

रायगडावरील जिल्हा परिषद विश्रांतीगृह पुन्हा उभारण्यात यावे तसेच शिवसृष्टी प्रकल्पासाठी मंजूर ५० कोटी रुपयांच्या निधीत वाढ करून नियोजित ८५ एकर क्षेत्रात कामे तातडीने सुरू करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत प्रत्येक शिवभक्ताने वर्षातून किमान एकदा रायगडाची वारी करावी, असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरतशेठ गोगावले, गोवा सरकारचे मंत्री सुभाष देसाई, विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. संयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

गेल्या ३० वर्षांतील विक्रमी उपस्थिती यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्यात पाहायला मिळाली. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांचे सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT