

इलियास ढोकले
नाते : किल्ले रायगड परिसरामध्ये मंगळवारी (दि. २३ जून) अतिवृष्टी झाल्यामुळे पायरी मार्गावरील महादरवाजा जवळील काही भागांमध्ये दरडी कोसळल्या. यामुळे गडावर जाणारा पायरी मार्ग बंद झाला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे दि.२४ जून आणि २५ जून या २ दिवशी पर्यटक व शिवभक्तांसाठी हा मार्ग बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर देखील पावसाचा परिणाम झाल्यामुळे सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे.
मंगळवारी (दि. २३) महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामध्ये गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर असलेल्या महादरवाजाजवळ दरडी कोसळल्या. त्यामुळे हा मार्ग " आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये" पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. याची पर्यटकांनी आणि शिवभक्तांनी नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.