महेंद्र खैरे
रेवदंडा: चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी, प्राचीनकाळी चौलमध्ये ३६० मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्दीस असलेले चौलचे शीतळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. भक्तांना कौल देणारे जागृत देवस्थान म्हणून शीतलामाता मंदिर आजही भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
अलिबागपासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या चौलनाका येथून आग्रावकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये शीतलामाता मंदिर आहे. पूर्वीची स्थिती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिण खाडीजवळ बांधले होते.
परंतु आता जवळपास खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या घराण्याची या देवतेवर हढ श्रध्दा होती. मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार झाल्याचे लिखीत मिळते. या मंदिराचा प्रथम जीर्णोध्दार बाबूभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे.
इ.स. १७६७ मध्ये विसावी सरसुभेदार यांनी ब्राह्मण भोजन घातले, १७८५ मध्ये एप्रिलच्या सुमारास राघोजी आही कुटूंबासह देवीच्या दर्शनाला आले होते. तर १७९२ च्या ऑक्टोबर महिन्यात मुलाबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले होते.
पूर्वीचे कालीन लाकडी व कौलारू मंदिर आता पाहून त्या वास्तूतील मूर्तीची जागा न बदलता ग्रामस्थांनी जीर्णोध्दार समिती नेमून २७ मार्च १९९० रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन सिमेंट क्रॉकिटचे मंदिर बांधण्यास सुरूवात केली.
मार्च १९९७ मध्ये रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड यांचे हस्ते जीणौध्दाराचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटन करण्यात आले. ही देवता महाराष्ट्रात नव्हे तर अन्य प्रांतातील अनेक कुटुंबाची कुलदैवत आहे.
तर मंगळवार व शुक्रवार या दिवशी भाविक मनातील इच्छा अथवा अडचणी या विषयी देवीचा कौल मागतात. या मंदिराच्या बाहेर उजव्या हाताच्या हाताला गुलमादेवी, खोकलादेवी व खरूजादेवीच्या मूर्ती आहेत.
देवीची ओटी भरून शीतलामातेचा आशीर्वाद मोठ्या श्रध्दा व भक्तीने भाविक घेतात, तर शीतळामातेच्या मंदिराच्या समोरील पुष्करणीतील पाण्याने पाय धुवूनच मंदिरात प्रवेश घेण्याची प्रथा आहे तसेच विविध रोग आर्दीपासून सुटका होण्यासाठी या पुष्करणीतील पवित्र पाण्याने आंघोळ करण्याची श्रध्दा भाविक अद्यापी ठेवून आहेत. या देवीच्या परिसरात असलेल्या गोळबादेवी व भरडादेवी या शीतळामातेच्या उपदेवता असल्याचे सांगितले जाते.
शुभ कार्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. पुरातन पुष्करिणी (विहीर) : मंदिराच्या परिसरात एक प्राचीन आणि बारमाही गोड पाण्याचा तलाव (पुष्करिणी) आहे. स्थानिक कोळी बांधवांमध्ये लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या अंघोळीसाठी किंवा शुभ कार्यासाठी याच विहिरीचे पाणी वापरण्याची जुनी परंपरा आहे.
शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात
मंदिरात दरवर्षी अश्विन आणि माघ महिन्यात शारदीय व माघी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या १० दिवसांत पालखी सोहळा, कुमारिका पूजन आणि विविध धार्मिक विधी पार पडतात, ज्यासाठी हजारो भाविक चौलमध्ये गर्दी करतात.