

श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड औद्योगिक वसाहतीसह पोलादपूर आणि परिसरातील गावांसाठी रानबाजीरे धरण हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. आगामी काळातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी धरणातील तसेच नदीपात्रातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
या कामासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि एमएमए-सीईटीपीने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गाळ उपशाच्या कामासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शासन, उद्योग आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करतानाच, दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ बैठका आणि चर्चापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. शासन, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांनी एकत्रितपणे पाणी बचत व जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन गोगावले यांनी केले.
या बैठकीला महाड उत्पादक संघटना-सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पदाधिकारी पुरोहित, जे. पी. शेट्टी, तलाठी, महाड औद्योगिक क्षेत्राचे कार्यकारी अभियंता उईके, प्रांताधिकारी उमासे, तहसीलदार शितोळे यांच्यासह विविध कंपन्यांचे संचालक, कारखानदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.