पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून होणार होते मात्र ते आज ही कागदावर राहिले आहे पर्यटन विभाग मार्फत राज्यातील किल्ले व पर्यटन स्थळाचा विकास साधण्यात येत आहे असे असेल तरी पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा शासनाच्या विविध योजना पासून अलिप्त राहिला आहे त्याच प्रमाणे इतर गडकिल्ले वर प्रदक्षिणा मोहीम आखली जाते त्याच धर्तीवर चंद्रगड मोहीम आखल्यास या गडाचा इतिहास पुन्हा उजेडात येत शिवकालीन व्यवस्था दूरदृष्टी अभ्यासता येईल अशी अपेक्षा गड प्रेमी यांनी व्यक्त केली आहे.
महाबळेश्वरच्या ऑर्थर सीट च्या टोकावरुन विस्तृत प्रदेश न्याहाळायला मिळतो. प्रतापगड, रायगड, तोरणा हे किल्लेही येथून दिसतात. याच बरोबर खालच्या दरीत दबा धरुन बसलेला चंद्रगड उर्फ ढवळगड आपले लक्ष वेधून घेतो. ढवळी नदीच्या खोऱ्यात हा चंद्रगड पुर्वी जावळीच्या मोऱ्यांच्या अखत्यारीत होता.
जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब होता. हा चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी मोऱ्यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले.
जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता. वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफझलखान नक्की येणार हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे महाराज संधीची वाट पहात होते. इ.स.1655 -56 मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता ती वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोऱ्यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले.
चंद्रगडावरुन रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात. याचे उत्तुंग कातळ कडे पहाण्याची मैज काही न्यारीच आहे. चंद्रगडावरुन ढवळ्याघाटाची वाट दिसते. घाटाच्या माथ्यावरची खिंड आणि त्याच्या वर महाबळेश्वरचे ऑर्थर सीट नुसते पाहूनच थरार वाटतो. निसर्गाची लयलूट आणि सह्यद्री रौद्रभिषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थर झाल्याचे समाधान मिळते असे असले तरी प्रदक्षिणा मोहीम आखल्यास किंवा सुरू केल्यास अनेक गडप्रेमींना हा किल्ला अनुभवता येईल या साठी शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.
उमरठ अथवा ढवळे येथे मुक्कामी राहून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते. ढवळे गावातून सोबतीला वाटाडय़ा अवश्य घ्यावा. पाणी व खाद्यपदार्थ घेवून सकाळी लवकर निघावे. ढवळेगावापुढे पाच मिनिटांच्या चालीवर लहानशी वस्ती आहे. येथून वाट जंगलात घुसते. तासाभराच्या वाटचालीत आपण खिंडीत पोहोचतो या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड होते.
बसेसची सुविधा
मुंबई-पणजी महामार्गावर पोलादपूर गाव आहे. येथून चंद्रगडाच्या पायथ्याच्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. ठरावीक वेळेवर एस.टी.बसेसचीही सोय आहे. या गाडीमार्गावर ढवळे गावाच्या अलिकडे सहा कि.मी. वर उमरठ या गावी नरवीर तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. ती पाहून पुढे जाता येईल.