Raigad Historical Places pudhari photo
रायगड

Raigad Historical Places : मातीखाली दडलेला चांदोरेचा ८०० वर्षांचा इतिहास

माणगाव तालुक्यात शिलाहार काळापासून मराठा-ब्रिटिश संघर्षापर्यंतचा पुरातन वारसा उजेडात

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : अरुण पवार

माणगाव तालुक्यातील चांदोरे हे आजच्या नकाशावर दिसणारे एक साधे गाव; मात्र या गावाच्या मातीच्या प्रत्येक थराखाली कोकणच्या वैभवशाली इतिहासाची पाने दडलेली आहेत. तब्बल ८०० वर्षांचा सलग मानवी इतिहास आपल्या उदरात जपून ठेवलेल्या चांदोरेच्या पुरातत्वीय उत्खननामुळे कोकणच्या प्राचीन वैभवावर नव्याने प्रकाश पडला आहे.

शिलाहार काळापासून मध्ययुगीन राजवटी, मराठा कालखंड आणि पुढे ब्रिटिश सत्तेच्या उंबरठ्यापर्यंतचा इतिहास येथे विविध पुराव्यांच्या रूपाने समोर आला आहे. त्यामुळे चांदोरे हे केवळ एक गाव नसून कोकणच्या प्राचीन व्यापार, संस्कृती, स्थापत्य आणि सामाजिक जीवनाचा जिवंत पुरावा ठरत आहे.

महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील भागातून कोकणातील किनारपट्टी आणि बंदरांकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर चांदोरेचे महत्त्वाचे स्थान असल्याचे पुरातत्वीय अभ्यासातून समोर आले आहे. माणगाव, गोरेगाव आणि पुढील किनारी भागांना जोडणाऱ्या या मार्गावरून व्यापारी, प्रवासी आणि मालवाहतूक होत असल्याचे पुरावे आढळतात. विविध कालखंडांतील नाणी, वास्तूंचे अवशेष आणि इतर पुराव्यांमुळे चांदोरेमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक हालचाली होत असाव्यात, असे संशोधकांचे मत आहे.

चांदोरेच्या उत्खननातील सर्वात लक्षवेधी अवशेषांपैकी एक म्हणजे जांभ्या दगडात कोरलेला पायऱ्यांचा जलाशय अर्थात प्राचीन बारव. या जलाशयाच्या भिंतीवरील देवकोष्ठात शिव-पार्वतीचे ‘हर-गौरी’ शिल्प आढळले आहे.

शिल्पकलेचा दर्जा आणि स्थापत्य वैशिष्ट्यांवरून या अवशेषांचा संबंध शिलाहार काळाशी जोडला जातो. आज आधुनिक पाणीपुरवठ्याच्या यंत्रणांमध्ये जगणाऱ्या पिढीसमोर शेकडो वर्षांपूर्वीच्या जलव्यवस्थापनाची ही कल्पकता आश्चर्यचकित करणारी आहे.

चांभारपाड्याजवळील परिसरात प्राचीन शिवमंदिर संकुलाचे अवशेष आढळले आहेत. गर्भगृह, दगडी अधिष्ठान, मंदिराच्या जोतीचे अवशेष तसेच भग्न नंदीचे शिल्प यामुळे येथे एकेकाळी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिर अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते. आज या अवशेषांकडे पाहताना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या वास्तूंची कल्पना येते आणि प्रश्न पडतो, इतिहासाच्या या अमूल्य खुणांचे आपण जतन करणार तरी कधी?

चांदोरे आणि परिसरात आढळलेल्या ‘गाय-वासरू’ शिळा हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पुरातत्वीय ठेवा आहे. काही शिळांवर अत्यंत सूक्ष्म कोरीवकाम असून काही साध्या स्वरूपाच्या आहेत. मध्ययुगीन काळात भूमिदान, जमिनीची हद्द किंवा सीमा निश्चित करण्यासाठी अशा शिळांचा वापर केला जात असल्याचे अभ्यासक सांगतात. आज त्या शेतांच्या बांधावर, रस्त्यांच्या कडेला किंवा घरांच्या मागे विखुरलेल्या दिसतात. मात्र प्रत्येक शिळा म्हणजे इतिहासाचा एक मूक दस्तऐवज आहे.

चांदोरे परिसरात आढळणारे वीरगळ आणि सतीशिळा या गावाच्या सामाजिक आणि संघर्षमय इतिहासाची वेगळीच बाजू समोर आणतात.

उत्खननाने उघडले इतिहासाचे दालन

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्स्ट्रा-म्युरल स्टडीज आणि संबंधित संशोधन संस्थांच्या माध्यमातून २०११ पासून झालेल्या उत्खनन व अभ्यासामुळे चांदोरेच्या पुरातत्वीय महत्त्वाला व्यापक व्यासपीठ मिळाले. नाणी, टेराकोटाच्या बांगड्यांचे तुकडे, मंदिरांचे अवशेष, जलरचना, शिल्पे, वीरगळ आणि इतर वास्तूंच्या खुणा यामुळे या गावातील मानवी वस्ती आणि आर्थिक-सामाजिक जीवनाची अनेक पदरे उलगडत आहेत.

इतिहासाचे अनेक अवशेष आजही दुर्लक्षित

चांदोरेची खरी शोकांतिका अशी की, ज्याच्या मातीखाली शेकडो वर्षांचा इतिहास जिवंत आहे, त्याच इतिहासाचे अनेक अवशेष आजही दुर्लक्षित अवस्थेत विखुरलेले आहेत. या पुरातन वारशाचे शास्त्रोक्त सर्वेक्षण, संवर्धन, माहितीफलक, संरक्षित क्षेत्राची निश्चिती आणि पर्यटकांसाठी ऐतिहासिक वारसा-दर्शनाची व्यवस्था झाली, तर चांदोरे रायगडच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र म्हणून उभे राहू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT