Raigad Highway Project : राष्ट्रीय महामार्गामुळे खाडीपट्टयाचा होणार कायापालट

महिलाही व्यवसाय करू लागल्या; गावातील बेरोजगारी होतेय हळूहळू कमी
Raigad Highway Project
Raigad Highway Projectpudhari photo
Published on: 
Updated on: 

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

महाड तालुक्यातील खाडीपट्टा परिसराचे नशीब आता बदलणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्गामुळे खाडीपट्टयाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक महाड शहरामध्ये २० किलोमीटर अंतर असणाऱ्या चिंभावेतून येण्यासाठी आता अवघ्या २० ते २५ मिनिटांचा अवधी लागणार असून, दोन पदरी महामार्गामुळे प्रवास अधिक जलदगतीने होणार आहे.

पूर्वी खाडीपट्टयातून महाडला यायचे म्हणजे मोठी दिव्यच होती. खड्डेमय रस्ता, अरुंद वळणे, पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ. गावातून महाडला जायला तास लागायचा. रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असेल तर जीव मुठीत घेऊन जावे लागायचे.

आता खाडीपट्टयातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या गोमेंडी हे गाव महाड शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे त्या गावातून ऐतिहासिक महाड शहरात येण्यासाठी फक्त २५ ते ३० मिनिटे लागतात. सकाळी घरातून निघाले की चहा गार होण्याआधी माणूस महाडमध्ये पोहोचतो. हीच खरी कायापालट आहे.

Raigad Highway Project
LPG Gas Delivery OTP Problem : ओटीपीच्या कचाट्यात गॅस ग्राहकांची ससेहोलपट

दोन पदरी रुंद, गुळगुळीत महामार्गामुळे गाड्या सुसाट धावू लागल्या आहेत. एसटी बस, खासगी गाड्या, दुचाकी - सगळ्यांचा प्रवास आता सुखकर झाला आहे. अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे, कारण रस्ता रुंद झाला आहे, वळणे सुधारली आहेत, ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. काही मोऱ्या आणि रावढळ पुलाचे काम अजून अपूर्ण आहे. ते झाल्यानंतर अगदी हा महामार्ग पूर्णत्वाला जाईल.

गोमेंडी, वराठी, चिंभावे, बेबलघर, तेलंगे, ओवळे, वलंग फाटा, सोनघर, जुई, कुंबळे, तुडील फाटा, रावढळ फाटा, कोसबी, गोठे, सव, मुठवली, चोचिंदे या महामार्गालगतच्या गावांना या महामार्गावरील प्रवास अगदी सोपा झाला आहे. त्याचबरोबर गावांमध्ये चिंभावे, वलंग, तुडील, रावढळ येथील पंचक्रोशीतील गावांना देखील या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

Raigad Highway Project
Thane Road Development : गायमुख ते फाऊंटन हॉटेलदरम्यानच्या रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण होणार

सदर महामार्गामुळे खाडीपट्टयात आणखी एक नवी क्रांती घडत आहे, ती म्हणजे महामार्गाच्या लगत गावोगावी छोटे छोटे स्टॉल उभे राहत आहेत. पूर्वी गावात काम नव्हते म्हणून तरुण शहराकडे जायचा. आता तरुण गावातच थांबून महामार्गावर स्टॉल लावतोय. कुठे चहा-वडापावचा स्टॉल, कुठे नाष्ट्याचं हॉटेल, कुठे पंक्चर - टायरचं दुकान. महामार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांमुळे या स्टॉलना चांगली गर्दी होऊ लागली आहे.

एका छोट्या स्टॉलमधून सुरू झालेला व्यवसाय आता कुटुंबाचा आधार बनला आहे. महिलाही आता स्टॉलवर बसून व्यवसाय करू लागल्या आहेत. गावातील बेरोजगारी हळूहळू कमी होऊ लागेल असा विश्वास या महिलावर्गाने व्यक्त केला आहे.

महाड ऐतिहासिक शहर

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, महाडचा चवदार तळे सत्याग्रह - या इतिहासामुळे महाडला नेहमीच महत्त्व आहे. पण खाडीपट्टा मात्र महाडपासून दूर वाटायचा. आता महामार्गामुळे हे अंतर संपलंय. खाडीपट्टा आता महाडचाच भाग वाटू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.