Ticketless travel penalty 71.31 crore
रोहे: प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास मिळावा, यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने तिकीटविना व अनियमित प्रवाशांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.आर्थिक वर्ष २०२५–२६ (एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६) या कालावधीत मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी उपनगरीय तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये १६.१६ लाख अनियमित प्रवासाची प्रकरणे शोधून काढली असून त्यांच्याकडून ७१.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत १५.९० लाख प्रकरणे आढळून आली होती. त्या तुलनेत यंदा सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच दंडातून वसूल झालेली रक्कमही गेल्या वर्षीच्या ६८.५६ कोटी रुपयांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी अधिक आहे.
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आढळलेल्या प्रकरणांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
वातानुकूलित (एसी) लोकल : १.१० लाख प्रकरणे – ३.५१ कोटी रुपये दंड
प्रथम श्रेणी डबे : १.४६ लाख प्रकरणे – ४.६६ कोटी रुपये दंड
द्वितीय श्रेणी डबे : ११.६८ लाख प्रकरणे – ५८.६० कोटी रुपये दंड
मेल व एक्सप्रेस गाड्यांमधील भाडे फरक : ५०,८०९ प्रकरणे – २.९८ कोटी रुपये दंड
बुक न केलेले सामान : १.४० लाख प्रकरणे – १.५६ कोटी रुपये दंड
सध्या Central Railway कडून एकूण ९४ वातानुकूलित लोकल सेवा चालवल्या जात असून त्यापैकी १४ सेवा हार्बर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. एसी लोकलमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे २०२५–२६ या आर्थिक वर्षात १.१० लाख प्रकरणे आढळून आली असून त्यातून ३.५१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
दररोज सरासरी ४०१ प्रकरणे आढळून येत असून सुमारे १.२७ लाख रुपये दंड वसूल केला जात आहे. गेल्या वर्षी ८९,७९९ प्रकरणांतून २.९६ कोटी रुपये दंड वसूल झाला होता. त्याच्या तुलनेत यंदा प्रकरणांत २३ टक्के आणि दंड वसुलीत १८ टक्के वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२६ या महिन्यातच १.६५ लाख अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून ८.५८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे –
एसी लोकल : १२,२३५ प्रकरणे – ३८.५६ लाख रुपये
प्रथम श्रेणी : १२,६५१ प्रकरणे – ४०.१३ लाख रुपये
द्वितीय श्रेणी : १.१३ लाख प्रकरणे – ६.६८ कोटी रुपये
मेल-एक्सप्रेस भाडे फरक : १६,३५९ प्रकरणे – ९९.१३ लाख रुपये
बुक न केलेले सामान : १०,५७९ प्रकरणे – १२.८३ लाख रुपये
मुंबई विभागाकडून मेल-एक्सप्रेस तसेच उपनगरीय गाड्यांमध्ये वेळोवेळी विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या जातात. या मोहिमांमुळे तिकीटविना किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणे शक्य होते आणि इतर प्रवाशांनाही अशा प्रकारच्या प्रवासापासून परावृत्त करण्यास मदत होते.
मध्य रेल्वेने प्रवाशांना गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी वैध व योग्य तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तिकीटविना प्रवासाबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण कायम ठेवत प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सन्माननीय प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.