

Railway Station Redevelopment
रोहे : मध्य रेल्वे आपल्या संपूर्ण नेटवर्कमधील स्थानकांवरील सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी मुंबई विभागात विविध सुधारणा व नव्या सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.
जानेवारी २०२६मध्ये मुंबई विभागात एकूण ४ नवीन एस्केलेटर कार्यान्वित करण्यात आले. यामध्ये कसारा रेल्वे स्थानक येथे २ आणि बदलापूर रेल्वे स्थानक येथे २ एस्केलेटरचा समावेश आहे.
तसेच २ नवीन लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून वांगणी रेल्वे स्थानक येथे १ आणि बदलापूर येथे १ लिफ्ट बसविण्यात आली आहे.
ही सुविधा ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांगजन तसेच इतर प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून फलाटांदरम्यान सुरक्षित व सुलभ हालचाल शक्य झाली आहे.
विविध स्थानकांवर १४२ नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट (BLDC) पंखे बसविण्यात आले असून २८९ जुने पंखे बदलण्यात आले आहेत. बीएलडीसी पंखे पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांच्या तुलनेत ५० ते ७० टक्के कमी वीज वापरतात आणि कमी आवाजात कार्य करतात. इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर व कायमस्वरूपी चुंबकांच्या वापरामुळे हे पंखे अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरतात.
दादर रेल्वे स्थानक येथील विविध फलाटांवर ८ नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड (HVLS) पंखे बसविण्यात आले आहेत. हे पंखे मोठ्या जागेत प्रभावीपणे हवा फिरवून थंडावा निर्माण करतात आणि कमी ऊर्जेत अधिक आराम देतात.
मुंबई विभागातील स्थानकांवर ३६२ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले असून १६३५ जुने दिवे बदलण्यात आले आहेत. हे दिवे ऊर्जा बचत करणारे, दीर्घायुषी आणि पर्यावरणपूरक असून देखभाल खर्चही कमी करतात.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ४ नवीन ट्रेन डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये २ इनडोअर व २ आउटडोअर डिस्प्ले बोर्डचा समावेश आहे.
तसेच नेरुळ रेल्वे स्थानक, पनवेल रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, शिवडी रेल्वे स्थानक आणि रे रोड रेल्वे स्थानक आदी स्थानकांवर एकूण ५६ नवीन उपनगरीय इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. नेरुळ येथील फूटओव्हर ब्रिजवर ६ नवीन इंडिकेटर्स देण्यात आले असून जुन्या इंडिकेटर्सचीही अद्ययावत बदलणी करण्यात आली आहे. नवीन इंडिकेटर्स अधिक आकर्षक व स्पष्ट दृश्यता देणारे आहेत.