उरण: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे किमान २० पूर्ण वाढ झालेल्या झाडांना छिद्रे पाडून त्यामध्ये रासायनिक द्रव्य सोडल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला आहे. झाडांमधून द्रव बाहेर येत असून परिसरात रसायनाचा उग्र वासही जाणवत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनने या प्रकाराची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे (मनपा) आयुक्त आणि शहर अभियंता यांना देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
झाडांना मुद्दाम छिद्रे पाडण्यात आली असून त्यातून द्रव बाहेर येताना मी स्पष्टपणे पाहिले, असे पर्यावरण कार्यकर्त्या परमदीप ग्रेवाल यांनी सांगितले. पारसिक ग्रीन्सचे संयोजक विष्णू जोशी यांनी ग्रेवाल यांच्यासोबत घटनास्थळाची पाहणी केली.
झाडांजवळ रसायनाचा उग्र वास जाणवत होता,असे त्यांनी सांगितले. झाडांच्या खोडाचा आणि तळाचा भाग तोडून किंवा सोलून त्यामध्ये द्रव्य सोडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा दावा जोशी यांनी केला.
या प्रकारामागे काही हितसंबंधी व्यक्तींचा हात असण्याची शक्यता नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली. इतक्या मोठ्या संख्येने पूर्ण वाढ झालेली झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,असे कुमार म्हणाले. दरम्यान भाजपच्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी या प्रकरणाची पाहणी करून घेण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, ही झाडे एनआरआय कोस्टल पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस आणि मनपाच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे मनपा मुख्यालयाच्या अक्षरशः नजरेसमोर हा प्रकार घडत असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला आहे.
या घटनेने नवी मुंबईच्या झपाट्याने घटत चाललेल्या हरित क्षेत्राबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. नियोजित शहर आणि ‘२१व्या शतकातील शहर’ अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत वाढत्या काँक्रिटीकरणाच्या तुलनेत वृक्षाच्छादन अत्यंत कमी असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
शहरी नियोजनात जगभर चर्चेत असलेला ‘३-३०-३००’ नियमही नवी मुंबईत गांभीर्याने राबवला जात नसल्याची टीका होत आहे. प्रत्येक घरातून किमान तीन झाडे दिसावीत, परिसरातील सुमारे ३० टक्के भाग वृक्षाच्छादित असावा आणि प्रत्येक नागरिकाला ३०० मीटरच्या अंतरात दर्जेदार हिरवी सार्वजनिक जागा उपलब्ध असावी, असा या नियमाचा उद्देश आहे.
हिवाळ्यात नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता अनेकदा चिंताजनक पातळीवर पोहोचत असताना मोठ्या झाडांचे महत्त्व आणखी वाढते. धूलिकण आणि प्रदूषक रोखणे, सावली व तापमान नियंत्रण, कार्बन शोषण,जैवविविधतेला आधार देणे अशी महत्त्वाची कामे ही झाडे करतात.