Bormach Landslide Pudhari
रायगड

Bormach Landslide: गणरायांच्या मार्गात दरडींचे विघ्न कायम!

महिन्यानंतरही बोरमाच रस्त्यातील मलबा हटवण्यास प्रशासन उदासीन, ग्रामस्थांपुढे प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: अतिवृष्टीचा तडाखा बसून बोरमाच गावाकडे जाणारा रस्ता दरड कोसळल्याने बंद होऊन तब्बल एक महिना उलटला; मात्र रस्त्यावरील मलबा आणि दगड - माती अद्यापही हटविण्यात आलेली नाही.

प्रशासनाच्या पाहण्या, आश्वासने आणि प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्या नंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने मुंबई, सुरत तसेच अन्य शहरांतून गावाकडे परतणाऱ्या ग्रामस्थासमोर ‘गणपती घरी आणायचा कसा?’ हा संतप्त सवाल उभा ठाकला आहे.

तब्बल एक महिन्यानंतरही बोरमाच रस्त्यावर आलेला दगड मातीचा मलबा हटवण्यास प्रशासन उदासीन झाल्याचे दिसत असून, गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे ग्रामस्थांपुढे मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

बोरमाच गावचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सुमारे महिनाभरा पूर्वी अतिवृष्टी मुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दगड, माती आणि मलबा आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच माणगावचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी रस्त्यावर आलेली दरड तातडीने हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महिन्याचा कालावधी लोटूनही हे आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरलेले नाही.

या काळात स्थानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच लोक प्रतिनिधींनी बोरमाच गावाला भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच प्रसारमाध्यमांनीही ग्रामस्थांच्या या गंभीर समस्येला वाचा फोडली.

तरीदेखील रस्त्यावरील मलबा हटविण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाहणी आणि आश्वासनांचा फार्स कधी संपणार ? असा सवाल ग्रामस्थाकडून उपस्थित केला जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सुरत अथवा अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसाया निमित्त राहणाऱ्या ग्रामस्थांना कदाचित या समस्येची तीव्रता दररोज जाणवत नसेल; मात्र गावात राहणाऱ्या आई-वडिलांना, वृद्धांना, महिला, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना या बंद रस्त्याचा मोठा फटका बसत आहे.

औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे, बाजारपेठेत दैनंदिन लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तू आणणे, शासकीय अथवा अन्य अत्यावश्यक कामांसाठी निजामपूर-माणगाव येथे ये-जा करणेही कठीण झाले आहे.

दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठीही ग्रामस्थांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. शासनाकडून नवीन रस्ता करण्याबाबत हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, नवीन रस्ता नेमका कधी प्रत्यक्षात येणार, याबाबत ग्रामस्थामध्ये संभ्रम आहे. इस्टिमेट तयार झाले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीत राहिला आहे. 

संपूर्ण रस्ता पूर्ववत करणे शक्य नसले तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, दुचाकी किंवा आवश्यक वाहने जाऊ शकतील एवढा मार्ग मोकळा करण्यासाठी तातडीची कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

बोरमाच गावचा रस्ता हा केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नाही. तो गावातील प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेला प्रश्न आहे. आई-वडील, वृद्ध, महिला, लहान मुले आणि आजारी नागरिक यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे.

त्यामुळे नवीन रस्त्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हातावर हात ठेवून बसण्या ऐवजी जुन्या रस्त्या वरील दगड माती तातडीने हटवून मार्ग सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून बोरमाच गावातील तसेच मुंबईत राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रश्नासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन गावातील नागरिकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT