शरद निकुंभ
पाली: देशभरात भारतीय जनता पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती रायगड जिल्ह्यातही होत असल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. रायगड जिल्हा परिषदेत भाजपचे नेतृत्व प्रस्थापित झाले असून सुधागड तालुक्यातही अपेक्षित संपूर्ण यश मिळाले नसले तरी पंचायत समितीवर सभापती व उपसभापती पदे मिळवून भाजपने आपली राजकीय ताकद सिद्ध केल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश देसाई यांनी सांगितले.
पाली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पाली शहरातील मुख्य फिल्टर जलयोजना, बायपास रस्ता, नवीन एसटी स्थानक, स्वतंत्र विद्युत फिडर, भूमिगत वीजवाहिन्या आणि परळी-जांभुळपाडा सबस्टेशन या महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला.
देसाई म्हणाले, पाली नगरपंचायतीत भाजपच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष कार्यरत असून राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील घटक पक्ष विकासकामांसाठी समन्वयाने काम करत आहेत. भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असला तरी मित्रपक्षांना सोबत घेऊन विकास साधण्याची पक्षाची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेत्या गीता पालरेचा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, नगराध्यक्ष पराग मेहता, शहर अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, महिला महिला अध्यक्षा प्रणाली शेठ, किसान किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुजित बारस्कर ,माजी नगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य फिल्टर जलयोजनेसाठी अतिरिक्त निधीचा पाठपुरावा- पाली शहरातील नागरिकांना शुद्ध व फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मुख्य फिल्टर जलयोजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. योजना मंजूर होऊन अंमलबजावणी सुरू झाली असली तरी काही प्रमाणात अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच निधी उपलब्ध होईल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नुकतीच भाजप शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन या विषयाकडे लक्ष वेधले असून नगराध्यक्षांनी त्यांना निवेदनही दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पालीसाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि भूमिगत वीजवाहिन्या- पाली शहर झपाट्याने विकसित होत असून तीर्थक्षेत्र म्हणूनही त्याचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वीज गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र विद्युत फिडर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे नेते सतीश धारप यांनी ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले असून मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून भविष्यात पालीची वीज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
परळी-जांभुळपाडा सबस्टेशन लवकरच- परळी-जांभुळपाडा परिसरात वारंवार होणाऱ्या व्होल्टेज चढ- उतारांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी परळी ग्रामपंचायतीमार्फत सुमारे चार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘विकासासाठी भाजपच सक्षम’
महाविकास आघाडीच्या काळात पालीतील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जलयोजना, बायपास, एसटी स्थानक, वीज प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर युद्धपातळीवर निर्णय घेतले जात असल्याचा दावा भाजपने केला. लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षात असल्यानेच सर्व समाजघटकांचा भाजपवर विश्वास वाढत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
तसेच भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप यांनी ऊर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन पाली शहरातील विद्युत समस्यांबाबत निवेदन सादर केले होते. त्यानंतर स्वतंत्र विद्युत फिडर, भूमिगत वीजवाहिन्या तसेच परळी-जांभुळपाडा सबस्टेशन या विषयांना गती मिळाल्याचेही पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील विकासकामांसाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावी पाठपुरावा सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एसटी स्थानकावरून श्रेयवादाला भाजपचे प्रत्युत्तर
पालीच्या नवीन एसटी स्थानकाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या श्रेयवादावरही भाजपने भूमिका स्पष्ट केली. परिवहन मंत्र्यांनी अलीकडेच पालीला भेट दिली असली तरी त्यापूर्वी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांनी परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला होता.
त्यानंतरच मंत्र्यांचा दौरा निश्चित झाला असल्याचा दावा भाजपने केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आमदार रवींद्र पाटील यांना परिवहन मंत्र्यांच्या पाली दौऱ्यात सहभागी होता आले नाही. मात्र त्यामुळे या प्रकल्पामागील त्यांचे योगदान कमी होत नाही, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारमधील महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री स्तरावर घेतले जातात. त्यानंतर संबंधित विभागीय मंत्री त्यांची अंमलबजावणी करतात. त्यामुळे विकासकामांचे श्रेय कोणत्याही एका पक्षाने घेणे योग्य नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
बायपास रस्त्याला शासनाची गती
पाली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित बायपास रस्त्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाचे अधिसूचनाही प्रसिद्ध झाले असून आवश्यक जमीन संपादन आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. पाली हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भविष्यातील वाढता ताण लक्षात घेऊन बायपास अत्यावश्यक असल्याचे भाजपचे मत आहे.