रायगड

तळीये दरडग्रस्तांची घरे पारंपरिक पद्धतीने बांधण्यासाठी प्रयत्नशील: भरतशेठ गोगावले

अविनाश सुतार

महाड, पुढारी वृत्तसेवा: काही घरांना गळती लागली आहे. दरवाजांच्या फ्रेम कमकुवत आहेत. दोन घरांमध्ये लेव्हल नाही. त्यामुळे डागडुजी करून ही घरे सुस्थितीत करावीत, अशा सुचना देऊन उर्वरित घरे पारंपरिक पद्धतीने बांधावीत, यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली. तळीये येथील दरडग्रस्तांसाठी बांधलेल्या ६६ घरांची पाहणी आज (दि.२६) आमदार गोगावले यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. म्हसे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार गोगावले म्हणाले की, म्हाडा मार्फत ६५० चौरसफुटांची घरे प्रथमच तळीये दरडग्रस्तांना मिळत आहेत. केवळ कोंडाळकर वाडी नव्हे तर, तळीये गावाच्या सर्व वाड्यांचे पुर्नवसन या ठिकाणी केले जात आहे. स्थानिक ठेकेदारांनीही येथील दरड ग्रस्तांच्या व्यथा जाणून त्यांच्या घरांचे काम करावे. पूर्ण झालेल्या घरांची थातूरमातूर दुरुस्ती केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा देत या ६६ घरांचे थर्ड पार्टी मार्फत ऑडीट करून घ्यावे, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

तळीये दरडग्रस्तांचे घरांच्या बांधकामाबाबत जोवर समाधान होत नाही, तोपर्यत ताबा दिला जाणार नाही, असे सांगत १५ ऑगस्टपर्यत घरांची डागडुजी पूर्ण करावी. असे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. यावेळी म्हाडाचे कोकण विभागाचे सीओ मोरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद म्हावरे, रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभागाचे अभियंता देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT