महाड : महाड नगर परिषदेची सत्ता नसतानाही शिवसेनेच्या माध्यमातून शहरात तब्बल 350 कोटींची विविध विकासकामे आणण्यात यश आल्याचा दावा करत, आगामी निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन शिवसेना नेते तथा माजी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी केले. महाड शहराचा मुळापासून कायापालट करण्यासाठी शिवसेनेलाच संधी द्या, असे ठाम विधान त्यांनी नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या शुभारंभावेळी केले.
प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना उमेदवार सिद्धेश पाटेकर आणि पुजा रोहीत गोविलकर यांच्या प्रचारार्थ दस्तुरी नाका येथे आयोजित कॉर्नर सभेत हा प्रचार मोहीमेचा नारळ फोडण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, शहरप्रमुख डॉ. चेतन सुर्वे, कुमार मेहता, बशीर चिचकर, दादा कदम, विद्या देसाई आदी उपस्थित होते. शिवसेना न.प.प्रचाराचा औपचारिक शुभारंभही याच सभेत करण्यात आला.यावर्षीही 20 कोटींचा गाळकाढणीचा निधी मिळाला होता, मात्र पावसाळा लवकर सुरू झाल्याने काही कामे अपूर्ण राहिल्याचे नमूद केले.
चवदार तळ्याचे सुशोभीकरण, शाहू महाराज सभागृह, दादली व गांधारी पुलांचे बांधकाम,छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, पार्किंग व शॉपिंग सेंटर निर्माण, 65 कोटींची पाणीयोजना, सावित्रीनदी काठावर 125 कोटींची गॅबरिंग वॉल अशी यादीजाहीर केली.महाडकरांनी एकदाच पालिकेची सत्ता शिवसेनेला द्या, आम्ही त्या संधीचे सोनं करू. आम्ही बोलतो ते करतो, आमची नितीमत्ता चांगली आहे, तोपर्यंत शिवसेनेला कोणी पराभूत करू शकत नाही, असे आवाहन गोगावले केले.
उपकार विकासकामातून फेडणार
कॉर्नर सभेत बोलताना ना. गोगावले यांनी महाड शहरासाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, नगर परिषदेकडे सत्ता नसताना देखील महाड शहरासाठी 350 कोटी रुपये मिळवून दिले. महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवांना शासनमान्यता मिळवून पोलिस मानवंदना सुरू केली. शहराच्या सुरक्षेसाठी ,सावित्री व काळ नदीतील गाळकाढणीसाठी गेल्या दोन वर्षांत 31 कोटी निधी मिळवून कामे पूर्ण केली.
विरोधकांनी 15 वर्षात 15 कामे दाखवावीत-सिद्धेश पाटेकर
सभेच्या सुरुवातीस प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार सिद्धेश पाटेकर यांनी आपल्या प्रभागात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मागील काही वर्षांत गोगावले यांच्या प्रयत्नांतून प्रभागात 15 कोटी रुपयांची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. यात सरेकर आळीतील बहुप्रतीक्षित सभागृह, अनेक नाले व अंतर्गत रस्ते, सायली कॉम्प्लेक्समधील गार्डन अशा कामांचा समावेश आहे. यासोबत या प्रभागातून सलग 3 टर्म निवडून आलेल्या नगरसेवकांनी 15 वर्षांत केलेली किमान 15 कामे दाखवावीत. प्रशासनिक इमारत बांधली तीही अपूर्णावस्थेत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
स्थानिक राजकारणात खळबळ; पूजा गोविलकरांचे गंभीर आरोप..
सभेत नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या पूजा रोहीत गोविलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाना जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले. गेल्या अनेक वर्षे आम्ही जगताप समर्थक म्हणून काम केले. विधानसभेची मोहीम देखील प्रामाणिकपणे केली. दोन वर्षांपूर्वी आम्हाला फिक्स उमेदवारीचे आश्वासन दिले होते. मात्र प्रभागातील ‘दुसऱ्या’ फिक्स उमेदवाराला घेऊन कार्यक्रम केले जात होते, आणि अखेरीस त्यालाही तिकीट न देता तिसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी दिली. हा आमच्या विश्वासघाताचा प्रकार आहे.
धनंजय देशमुख यांनी राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर रोहीतला नगरसेवक म्हणून घेतले जाईल असे हास्यास्पद आश्वासन दिले. तसेच संदीप जाधव यांनी विधानसभेत 4 लाख रुपये घेऊन पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप रोहीत गोविलकर यांच्यावर केल्याचा प्रसंग सांगितला. रोहीतच्या जवळच्या मित्राने हा आरोप फेटाळल्याचे सांगितले. मागील निवडणुकीत आमच्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला होता हे खरं. पण यंदा त्या पराभवाची व्याजासहित परतफेड करून दोन्ही जागा शिवसेनेच्या आणू. शिवसेनेच्या नगराध्यक्षांना विक्रमी मताधिक्य देऊ, असे त्यांनी जाहीर केले.
डॉ. चेतन सुर्वे यांनीही विकासकामांचा आढावा..
महाड शहरप्रमुख डॉ. चेतन सुर्वे यांनीही गोगावले यांच्या माध्यमातून शहरात झालेली विविध विकासकामे, पूरप्रश्न, पाणीपुरवठा आणि शहरी सुविधा यासंदर्भातील प्रकल्पांची माहिती सभेत मांडली. महाडमध्ये शिवसेनेने केलेल्या कार्याचा नागरिकांना विचार करून निर्णय घ्यावा, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.