Rice export 
रायगड

Rice export : अमेरिकेची टेरिफ वाढ; तांदूळ निर्यातीस धोका नाही

केवळ 3 टक्के तांदूळ अमेरिकेस होतो निर्यात, भारत सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड ः अमेरिकेने भारतीय तांदळावर मुख्यतः बासमती तांदळावर आधीच सुमारे 53 टक्के आयात शुल्क (टेरिफ) लावले आहे आणि पुढील शुल्काची धमकी दिली आहे. या आयात शुल्काचा भारतीय निर्यातदारांवर फारसा मोठा परिणाम होणार नाही, कारण अमेरिका तांदूळ निर्यातीची भारताची मुख्य बाजारपेठ नाही. भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या एकूण 20 दशलक्ष टन निर्यात होणाऱ्या एकूण तांदळा पैकी केवळ 3 टक्के तांदूळ अमेरिकेत निर्यात होती. अमेरिकेने तांदळावरील टेरीफ वाढवले तर अमेरिकेत निर्यात होणाऱ्या त्या 3 टक्के तांदळावरच त्याचा परिणाम होवू शकतो, मात्र उर्वरित निर्यात होणाऱ्या 97 टक्के तांदळावर त्याचा परिणाम होणार नाही. अमेरिकेतील ग्राहकांसाठी मात्र तांदूळ अधिक महाग होऊ शकतो असे मत अर्थ आणि निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांचे आहे.

भारतातून 172 हून अधिक देशांमध्ये तांदूळ होतो निर्यात

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारतातून सुमारे 172 हून अधिक देशांमध्ये तांदूळ पाठवला जातो. भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळामध्ये बासमती म्हणजेच प्रिमीयम ॲरोमेटीक राईस हा प्रथम क्रमांकाचा तांदूळ आहे. बासमती तांदळाची चव, सुगंध आणि लांबी यामुळे तो जगभरात, विशेषतः आखाती देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये सौदी अरेबिया हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आखाती देशातील भारतीय बासमती तांदूळ आयातदार देशांमध्ये इराण,संयुक्त अरब अमिरात (युएई), इराक या देशांचा समावेश आहे.

भारतीय तांदळाचे स्थान मजबूत

भारताची तांदूळ निर्यात केवळ पारंपरिक बाजारपेठांवर अवलंबून नसून, आफ्रिका आणि आशियातील अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये देखील वेगाने वाढत आहे. यामुळे भारतीय तांदूळ जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करत असल्याचा निष्कर्श या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.

अमेरिकेने भारतीय तांदळावर टेरिफ वाढवले आहे आणि आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे. हे अमेरिकेचे दबावतंत्र आहे. अमेरिकेने टेरिफ वाढवले तरी भारतीय तांदूळ निर्यातीवर त्यांचा फार मोठा परिणाम होणार नाही, कारण भारताच्या एकूण तांदूळ निर्याती पैकी केवळ 3 टक्के तांदूळ अमेरिकेत निर्यात होतो. परिणाम झालाच तर या 3 टक्के निर्यातीवर होईल आणि अमेरिकेत तांदळाचे भाव वाढू शकतील. त्यांचा फटका अमेरिकेतील तांदुळ ग्राहकांना बसू शकतो. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे आणि त्यांचे हे स्थान अढळ राहील अशी आजचीतरी परिस्थिती आहे.
- चंद्रशेखर टिळक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT