

टोकियो : भारतीय आहारातील तांदळाचे महत्त्व अनमोल आहे. कारण, तो शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे देतो; पण जगात असे एक तांदळाचे वाण आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण, हा तांदूळ जगातला सर्वात महागडा तांदूळ आहे. त्याची किंमत प्रति किलो 12 हजार 500 रुपये आहे. हा तांदूळ कुठे मिळतो आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
हा तांदूळ जपानमधील कोशिहिकारी प्रदेशात पिकवला जातो. त्याचे नाव किनमेमाई प्रीमियम असे आहे. या ठिकाणची विशिष्ट माती आणि हवामान या तांदळाच्या उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. या तांदळाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात होते. त्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आहे, ज्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. जपान हा तांदूळ जगाला पुरवतो. शिवाय उत्पादन कमी असल्याने आपोआप त्याची किंमतही जास्त आहे.
किनमेमाई प्रीमियम तांदळाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी तो एका विशेष प्रक्रियेतून जातो. त्याची निवड हाताने केली जाते आणि त्याची पृष्ठभागावरील स्टार्च आणि कोंडा काढून टाकण्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाते. यामुळे हा तांदूळ शिजवण्यापूर्वी धुण्याची गरज नसते. शिवाय तो आरोग्यासाठी ही चांगला समजला जातो. त्यातून अनेक पौष्टीक गोष्टी शरीराला मिळतात. तसा हा तांदूळ दुर्मीळ म्हणावा लागेल. या तांदळात लिपोपॉलीसेकेराइड्स (एलपीएस) नावाचे खास मिश्रण असते.
एलपीएस रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करते, असा दावा केला जातो. टोयो राइस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष केइजी सायका यांच्या माहितीनुसार, 2016 मध्ये जेव्हा ‘किनमेमाई प्रीमियम’ लाँच करण्यात आला, तेव्हा 840 ग्रॅम पॅकेटची किंमत 9,496 जपानी येन म्हणजे भारतीय चलनात 5,490 रुपये इतकी होती. आता प्रति किलो त्याची किंमत 12,557 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्यामुळे तो जगातील सर्वात महागडा तांदूळ ठरला आहे.