सावित्री खाडीवरील आंबेत पुलास दोन बार्जची धडक pudhari photo
रायगड

Raigad News : सावित्री खाडीवरील आंबेत पुलास दोन बार्जची धडक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबेत-म्हाप्रळ मार्गावरील सावित्री खाडीवरील आंबेत पुलाला सोमवारी पहाटे पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या दोन मोठ्या बार्जेसनी धडक दिली. या बार्जेस पुलाच्या खालच्या भागात अडकून पडल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाच्या उपस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आदेश देत पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुसळधार पाऊस, सावित्री नदीला आलेला पूर आणि भरतीचे पाणी यामुळे महाड परिसरातून वाहत आलेल्या दोन बार्जेस पुलाखाली अडकल्या. घटनेनंतर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. प्रशासनाने सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुसळधार पाऊस आणि भरतीच्या पाण्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी पत्र देऊन पुलावरील वाहतूक पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलाखाली अडकलेल्या दोन्ही बार्जेस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्या हटविल्यानंतर पुलाची तांत्रिक पाहणी करून पुढील वाहतुकीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.

सध्या पुलावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून या मार्गावरील वाहनांची वाहतूक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामार्गे वळविण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून बार्जेस हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणार्‍या सावित्री नदीवरील आंबेत पूल हा प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. तीन ते चार वर्षांपूर्वी आंबेत पुलाची डागडुजी करण्यात आली होती. त्यादरम्यान आंबेत पुलाचा प्रश्न बहुचर्चित झाला होता. पुलाच्या सुरक्षतेबाबत येथील स्थानिक पातळीवर नेहमीच संवेदनशीलता पाहायला मिळते. कारण दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांची मुंबई, पुणेकडे होणारी प्रवासी व सर्वच प्रकारची वाहतूक याच पुलावरून होत असते.

तीन वर्षांपूर्वी डागडुजी करिता या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने मंडणगड व दापोली मार्गावरील बाजारपेठ प्रभावित झाली होती. त्यामुळे ६ जुलै रोजी सकाळी मोठ्या वजन क्षमतेचे बार्जेस पुलाला धडकल्याचे वृत्त कळताच येथील प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाय आंबेत, म्हाप्रळ परिसरातील व मंडणगड तालुक्यातील नागरिकांनी पुलावरील ही घटना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT