Drug addiction | अमली पदार्थांची मगरमिठी

Drug addiction |
Drug addiction | अमली पदार्थांची मगरमिठी(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणार्‍या भारतातील युवापिढी एकीकडे आपल्या प्रतिभेतून विश्वाला गवसणी घालत आहे, तर दुसरीकडे याच तरुणाईमध्ये वाढत चाललेला अमली पदार्थांचा विळखा गहन सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या घटनेने या प्रश्नाचे गांभीर्य नव्याने समोर आले आहे. प्रचंड जल्लोषात सुरू असलेल्या या कार्यक्रमात ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कॉन्सर्टसाठी तब्बल 3 ते 4 हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. कॉन्सर्टदरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे उघड झाले आहे.

आधुनिक महानगरीय संस्कृतीची भेदक बाजू यानिमित्ताने समोर आली. मुंबईच नव्हे, तर देशातील अनेक महानगरांमधील लाईव्ह कॉन्सर्ट किंवा म्युझिक फेस्ट हे युवा पिढीसाठी स्टेटस सिम्बॉल बनले आहेत. या कार्यक्रमांमध्ये जाणे, तिथे महागड्या मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन करणे यात गैर काहीच नसून बदलत्या काळाचा प्रवाह आहे, असा समज तरुणाईत रूढ होत आहे. वाढती स्पर्धा, करिअरचा ताण आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आलेले एकटेपण घालवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी अशा तात्पुरत्या सुखाच्या शोधात असतात. अमली पदार्थांचे सेवन हे या ताणातून मुक्तता करून घेण्याचे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. अर्थात, हे आज घडते आहे असे बिलकूल नाही. नव्वदीच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणानंतर एकंदरीतच चंगळवादी संस्कृती फोफावण्यास सुरुवात झाली. आधुनिकतावादाच्या पांघरुणाखाली पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याचा प्रवाह रूढ झाला. चित्रपट, मालिकांमधून मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि एकंदरीत पार्टी कल्चरला अमाप प्रसिद्धी मिळाली. पुढील काळात समुद्रकिनार्‍यांवर आयोजित केल्या जाणार्‍या रेव्ह पार्ट्यांची लाट आली. ड्रग्जचा बेसुमार वापर आणि इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक यामुळे अशा पार्ट्या तरुणांमध्ये लोकप्रिय झाल्या. हा ट्रेंड गोवा, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये पसरला.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ड्रग्ज पार्ट्यांचे लोण अनेक वर्षांपासून आहे. 2007 मध्ये विद्येचे माहेरघर असणार्‍या पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून तब्बल 280 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यात नामांकित आयटी कंपन्यांचे कर्मचारी, व्यावसायिक आणि उच्चभ्रू विद्यार्थ्यांचा समावेश होता. या घटनेने पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात ड्रग्ज संस्कृती किती खोलवर रुजली आहे, हे पहिल्यांदाच भीषण स्वरूपात समोर आले होते. 2008 मध्ये जुहू येथील रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यामध्येही 200 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अलीकडील काळात पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्ज रॅकेटची बरीच चर्चा झाली. कारवाईच्या बडग्यापासून बचाव करत अशा अनेक सांगीतिक मैफिली अमली पदार्थांचे उघडपणाने सेवन करत होत असतात. मध्यंतरी पोलिस प्रशासन आणि सरकारने अमली पदार्थांविरोधातील कारवाई कडक केली. समुद्रमार्गाने होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी सागरी गस्त वाढवली, कोट्यवधी रुपयांचे कोकेन, एलएसडी, मेफेड्रॉन, एक्स्टसी गोळ्या यांसारखे मादक पदार्थ जप्त केले, तरीही तपास यंत्रणांना चकवा देत अमली पदार्थांचा प्रसार, व्यापार आणि वापर अव्याहत सुरू आहे, हे गोरेगावमधील घटनेने स्पष्ट केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड तसेच पालघर परिसर अमली पदार्थांची केंद्रे होऊ पाहत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने भिवंडीत कारवाई करून 800 कोटींचा 792 किलोंचा लिक्विड एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. 2023 या एका वर्षात विविध राज्यांच्या पोलिसांनी 25 हजार कोटींहून अधिकचे अमली पदार्थ जप्त केले होते. यावरून यातील अर्थकारण किती मोठे आहे, हे लक्षात येईल.

उद्याच्या भारताची शिल्पकार असणार्‍या नवतरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून या देशाचे भविष्य उद्ध्वस्त करणे हा सुनियोजित कट आहे. प्रत्यक्ष युद्धात भारताला पराभूत करता येणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ हे धोरण स्वीकारले असून त्या व्यापक कटाचा हा भाग आहे. कधी हवाई मार्गाने, कधी जमीन मार्गाने किंवा कधी समुद्र मार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन अशा अमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे प्रमाण काही टनांमध्ये आहे. या तस्करीतून, व्यापारातून मिळालेला पैसा पाकिस्तान शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी करतो. त्यामुळे अमली पदार्थांचे सेवन हा राष्ट्रद्रोह आहे, राष्ट्रविरोधी कृत्य आहे. दुर्दैवाने, तरुण पिढीला याची जाणीवच नसते. मौज, तणावमुक्ती, स्टेटस सिम्बॉल अशा सबबी देत अमली पदार्थांचा पहिला कश ओढला जातो; पण तिथून वैचारिक, आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक अधःपतनाची सुरुवात होते आणि ती वाट विनाशाकडे घेऊन जाते.

देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे तरुण-तरुणी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. या शिक्षण संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारे अड्डे तयार झाले आहेत. तरुण रक्ताची सळसळ राष्ट्र विकासासाठी खर्ची पडण्याऐवजी शत्रू राष्ट्राला अप्रत्यक्ष हातभार लावत असेल, तर ती राष्ट्रीय सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. भारतातून विदेशात जाणार्‍या ‘ब—ेन ड्रेन’चा मुद्दा जितका चिंतेचा आहे, तितकाच इथे असणार्‍या युवाशक्तीला आतून पोखरणार्‍या अमली पदार्थांचा विळखाही. उद्याच्या पिढीला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समाज, शासन-प्रशासन आणि कायदा या तिन्ही स्तरांवर युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत; पण सर्वाधिक जबाबदारी आहे ती पालकांची. बदलत्या काळात मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे पालकांचा कल असतो. त्या जोडीला मुलांना क्वालिटी टाईम देऊन व्यसनाधिनतेचे धोके बालपणापासूनच सांगण्याची गरज आहे. व्यसनाधिनतेचे परिणाम लपून राहत नाहीत. पाल्याच्या वर्तणुकीतील बदलातून ते सहजगत्या लक्षात येतात. त्यासाठी पालकांनी सदोदित जागरूक राहणे, ही काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news