Ambenali Ghat Accidents Pudhari
रायगड

Ambenali Ghat Accidents: आंबेनळी घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण

२८ जुलै २०१८ च्या बस अपघातानंतर उपाययोजनाचे अभाव; अर्धवट कामांमुळे अपघाताचे सावट

पुढारी वृत्तसेवा

समीर बुटाला

पोलादपूर: महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या 'आंबेनळी घाटात' सुरू असलेल्या मृत्यूच्या साखळीने जनसामान्य माणसात प्रवास करणे भीतीदायक झाले आहे. आंबेनळी घाटात सतत होत असलेल्या अपघातांमुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करणे भितीदायक ठरत आहे. आंबेनळी घाटात वारंवार होत असलेल्या अपघातांकडे शासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

२८ जुलै २०१८ च्या दिवशी दापोली येथील कृषी विद्यापीठ च्या कर्मचारी ची बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ३० जणांचा मृत्यू होता या नंतर या ठिकाणी अनेक अपघात झाले नुकताच सातारा जिल्ह्यातील ८ तरुण मुलांचा भीषण अपघात मृत्यू झाला होता त्याची काळ्या रंगाची स्कार्पिओ दरीत कोसळली होती अपघाताचा ठाव ठिकाणी १२ तासानंतर उलघडला होता आजही या अपघाताच्या आठवणीने काळजाचा थरकाप उडत आहे.

एकीकडे वाई शिरूर सातारा इकडच्या रस्त्यांची आढावा बैठक मंत्रालयात घेतली जाते. परंतु आंबेनळी घाटात सतत होत असलेल्या अपघातांच्या बाबतीत आढावा बैठक का घेतली जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले होते रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटातील काही ठिकाणी रस्ता खणून ठेवला असून, कामाचा वेग संथ असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही दिवसांपासून घाटात संरक्षक भिंती आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी संरक्षण कठडे काढण्यात आले असून त्या जागी कोणतीही तात्पुरती सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही.

वळणांवर रस्ता अरुंद झाल्याने समोरील वाहनाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहने दरीत कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. आंबेनळी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मुख्य मार्ग आहे.

येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. आंबेनळी घाटासारख्या संवेदनशील भागात पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे होते. मात्र तसे झाले नसल्याने पावसाळ्यात डोंगराची माती मऊ झाल्याने दरड कोसळत आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघाताची शक्यता आहे.

आंबेनळी घाट वाहतुकीसाठी असुरक्षित

या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने 'बी.एम. आणि ए.सी.' पद्धतीचा वापर करून पाण्याचा निचरा होईल अशा दर्जाचे रस्ते बनवणे आवश्यक आहे. घाट रस्ता असल्याने जिथे दरडी कोसळण्याची शक्यता आहे किंवा जिथे खोल दरी आहे, तिथे सिमेंटच्या संरक्षक भिंती किंवा 'क्रॅश बॅरियर्स' बसवणे अनिवार्य आहे.

रस्त्यांच्या कडेला पक्की गटारे बांधणे, जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावर साचून खड्डे पडणार नाहीत. ज्या ठिकाणी कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले आहे, तिथे 'पेव्हर ब्लॉक' किंवा तातडीचा खडीकरण थर टाकून रस्ता समतल करणे. रात्रीच्या वेळी धुक्यातून प्रवास करताना अडचण येऊ नये म्हणून वळणांवर पथदिवे बसवणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT