

श्रीकृष्ण बाळ
महाड: मागील काही वर्षापासून भातशेतीमध्ये आलेल्या अमुलाग्र बदलाचा परिणाम महाड तालुक्यात दिसून येत असून चालू वर्षी यंत्राद्वारे भात लागवड करण्याच्या प्रकाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती किरण कोकरे महाड कृषी विभाग यांचेकडून देण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील वीर येथील प्रभाकर भोईर व संदीप भोईर यांनी २५ जुलै रोजी प्रत्येकी १ एकरावर यंत्राद्वारे लागवड करून तालुक्याचा या आधुनिक पद्धतीचा शुभारंभ केला. यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण कोकरे यांसह भरत कदम मंडळ कृषी अधिकारी महाड किरण तोरणे, उप कृषी अधिकारी महाड, मुग्धा किंजटकर सहाय्यक कृषी अधिकारी, प्रभाकर भोईर,संदीप भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्याच्या खाडीपट्टा भागातील वलंग येथील गणेश कुर्डुनकर यांसह १२ शेतकऱ्यांनी १० एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच लक्ष्मण शेलार आचळोली दोन एकर, प्रशांत पालांडे तेटघर एक एकर, वैभव कदम कोथुर्डे एक एकर, संतोष भोसले विन्हेरे तीन एकर हे शेतकरी पुढील दिवसांमध्ये यंत्राद्वारे भात लागवड करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक माहिती देताना किरण कोकरे यांनी स्पष्ट केले की, यंत्राद्वारे भात लागवड करण्याकरिता भातरोपे दोन फूट बाय एक फूट व एक इंच खोल आकाराप्रमाणे प्लास्टिक ट्रे मध्ये तयार केली जातात.
एका ट्रेमध्ये दीड किलोग्रॅम माती व शेणखत मिश्रण तसेच ७० ग्रॅम बियाणे वापरण्यात येते. भात लावणीच्या अंतरानुसार एक एकर क्षेत्रापर्यंत ९० ते १०० ठिकाणी रोपे लावू शकतात. एक एकर दोन खंडी भात लावण्याकरिता फक्त सात किलोग्रॅम बियाणे लागते पारंपारिक पद्धतीमध्ये हेच 20 ते 25 किलोग्रॅम बियाणांचा वापर करावा लागतो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन
यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस व त्यानंतरचे अतिवृष्टी पाऊस यामुळे पारंपरिक भातरोप वाटिका परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी येथील ट्रे पद्धतीने रोपे तयार करून मशीनद्वारे भात लावणी केल्यास होणाऱ्या खर्चात मोठी कपात होऊन अधिक उत्पन्न येण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त करून महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेती करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण कोकरे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.