कमलाकर होवाळ
माणगाव: कोकण आणि पुणे परिसराला जोडणारे आंबेनळी व ताम्हिणी हे दोन घाट निसर्गाच्या अपूर्व सौंदर्याने नटलेले आहेत. हिरव्यागार डोंगररांगा, कोसळणारे धबधबे आणि वळणावळणाचा रस्ता यामुळे वर्षभर लाखो पर्यटक येथे येत असतात.
मात्र हेच घाट आज प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले असून गेल्या काही वर्षांत येथे झालेल्या असंख्य अपघातांनी अनेक निष्पाप कुटुंबांना उद्ध्वस्त केले आहे. नुकत्याच झालेल्या आंबेनळी घाटातील एका भीषण अपघातात आठ तरुणांचे जीव अकाली गेले, तर ताम्हिणी घाटानेही गेल्या काही वर्षांत अनेक बळी घेतले आहेत. तरीही प्रशासन ठोस उपाययोजना करण्यास तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळत आहे.
या घाटांमधील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असताना रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडेही नाहीत. धोकादायक वळणांवर चेतावणी फलक नसल्याने वाहनचालकांना अचानक वळण आल्याचे कळत नाही.
रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना अत्यंत तोकडी असल्याने अंधारात प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरण्यासारखेच आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर परिस्थिती अधिकच बिकट होते. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि घसरड्या रस्त्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटते आणि क्षणार्धात एखादा जीव दरीत लोटला जातो.
दरड कोसळण्याचा धोकाही पावसाळ्यात सतत टांगत्या तलवारीसारखा असतो. या घाटांतून दररोज हजारो पर्यटक, दुचाकीस्वार, मालवाहतूक वाहने आणि एसटी बसेस ये-जा करतात. वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अत्यंत अपुरी असल्याने काही ठिकाणी दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो.
सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी अनेक पटींनी वाढते आणि त्या गोंधळात काही तरुण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याच्या नादात रस्त्यावरच स्टंट करू लागतात. त्यामुळे स्वतःचा जीव तर धोक्यात येतोच, शिवाय इतर निरपराध प्रवाशांचाही जीव जोखमीत सापडतो.
अपघातांमागे केवळ रस्त्याची दुरवस्था नाही, तर चालकांचा अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे आणि घाटरस्त्याच्या बाबतीत असलेली बेफिकीर वृत्ती हीदेखील तितकीच जबाबदार आहेत.
मात्र या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणाच येथे अस्तित्वात नाही. सीसीटीव्ही नाहीत, वेग नियंत्रण यंत्रणा नाही, पुरेसा पोलिस बंदोबस्त नाही आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळेल अशी कोणतीही व्यवस्था नाही.