नागोठणे :रोहा तालुक्यातील आंबेघर येथील ग्रामस्थांना गेली महिनाभर पिण्याचे पाणी येत नसल्या कारणाने ग्रामस्थ पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचे एक निवेदन ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी ( 12 मार्च पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयात दिले आहे. पाणी न मिळाल्याने कुणी पाणी देता का पाणी... अशी आरोळी मारण्याची वेळ आंबेघर ग्रामस्थांवर आली आहे.
आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसात पाणी न मिळाल्याने आंबेघर येथील बळीराम बडे व गंगाराम मिनमीने यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने पिंगोडे ग्राम सेवक यांच्या नावे ग्राम पंचायतकडे दिलेल्या निवेदनात आपणांस विनंती करतो की आंबेघर गावातील ग्रामस्थ यांना एक महीना पासुन पाणी येत नाही. तरी आंबेघर गावातील ग्रामस्थांना त्वरीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामपंचायत पिगोंडे येथे हंडा मोर्चा आंदोलन करणार असल्याचे सांगून लवकरात लवकर पिण्याकरीता पाणी मिळावे अशी विनंती शेवटी निवेदनात केली आहे.
सदरील निवेदन हे आंबेघर ग्रामस्थ व महिला वर्गांच्या उपस्थितीत पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले. शासनाच्या नियमानुसार गावातील दर कुटुंबास पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने शासनाकडून ग्राम पंचायत अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना चालू केली आहे.परंतु रिलायन्स कंपनीमध्ये नवीन कामे चालू असल्याने तेथे आलेले कामगार गावात भाडोत्री राहत आहेत.त्यामुळे पाणी पुरवठ्यावर ताण येत आहे.तसेच काही नागरिक अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असून काही ठिकाणी अनधिकृत इलेक्ट्रिक पंप लाऊन पाणी घेतले जाते,अशी माहिती ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे यांनी दिली.
अनेक वेळा जनजागृती व आवाहन करूनही अशा लोकांची नावे ग्रामपंचायतमध्ये कळविण्यात आली नाहीत. अशा लोकांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच नवीन ठेवलेले भाडोत्री यांची संख्या, त्यांचे आधारकार्ड याची नोंद ग्रामपंचायतकडे केलेली नसल्याने पाणी पुरवठ्यावर ताण येत असून त्याच प्रमाणे अशा नोंद नसल्याने गावात अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विजय अहिरे, ग्रामविकासअधिकारी