माणगाव : कमलाकर होवाळ
कोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात मोठी मागणी असलेल्या या आंब्याच्या हंगामाकडे दरवर्षी उत्सुकतेने पाहिले जाते; मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू या दोन्ही नगदी पिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. उत्पादनात तब्बल 90 टक्क्या पर्यंत घट झाल्याचे चित्र असून, उर्वरित पिकावरही रोग व अवकाळी पावसाचे सावट कायम उभे ठाकले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील बागायतदार शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
हापूसच्या पहिल्या पेटीसाठी मुंबईपुणे बाजारपेठेत श्रीमंत ग्राहकांची लिलावात चढाओढ असते; परंतु यंदा ‘पहिला आंबा कोण खाणार?’ हा प्रश्नच अनुत्तरित राहण्याची वेळ आली आहे. हवामानाचा घातक खेळ निसर्गाने मांडला असून याबद्दल त्या हवामानाने मोहरावरच घाव घालून बागायतदारांचे प्रचंड नुकसान केले आहे. यंदाच्या हंगामात हवामानाने अक्षरशः लपंडाव खेळला आहे. पाऊस उशिरा थांबला तसेच थंडी उशिरा सुरू झाली मध्येच तापमानात अचानक वाढ या चढउतारा मुळे डिसेंबरमध्ये यायला हवा असलेला आंब्याचा मोहोर उशिरा आला. जानेवारीत थंडीचा परिणाम दिसला; मात्र त्यानंतर अचानक तापमान वाढल्याने मोहर गळून पडला. परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, कोल्हापूर व अलिबाग येथे बहुतांश भागात सुरुवातीला मोहोर दिसत असला तरी प्रत्यक्षात फळ धारणा अत्यल्प राहिली. सध्या अनेक ठिकाणी केवळ 5 टक्केच आंबा शिल्लक आहे. त्यातच अवकाळीचा फटका बसत आहे.
‘यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यातील आंबा फळपीक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची शासनाला पूर्ण जाणीव आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या असून, नुकसानीचा अहवाल आल्यानंतर त्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य ती नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. शासन या विषयात अत्यंत सकारात्मक असून, आंबा उत्पादकांना निश्चितपणे न्याय मिळेल.भरत गोगावले, फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र
या फळावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यावर औषध फवारणीवर खर्च वाढला आणि उत्पादन शून्य अशी स्थिती झाली. हवामानातील बदलामुळे तुडतुडे व भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी मोठा खर्च केला एका फवारणीसाठी तब्बल 45 हजार रुपये माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील बागायतदार शेतकरी अबूबकर गंगरेकर यांना आला खर्च आला. त्यांनी आपल्या आंबा फळ पिकावर तीन ते चार वेळा औषध फवारणी केली. तरीही उत्पादनावर काहीच परिणाम झाला नाही. “फवारणी केली, एवढंच समाधान; पण हातात काहीच आलं नाही,” अशी शेतकऱ्यांची हतबल प्रतिक्रिया आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 12000 चे वर हेक्टरवर आंबा लागवड असून 12000 हजार हेक्टर उत्पादन क्षम क्षेत्र आहे.
रायगड जिल्ह्यात 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा फळ बागायती क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात 90 टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्ह्यात विद्यापीठाच्या तज्ञ शास्त्रज्ञांकडून नुकसानीचा सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत अद्याप शासन स्तरावरून नुकसान भरपाईचे आदेश आलेले नाहीत. शासनाकडून जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड