Mahad Illegal Tree Cutting Pudhari
रायगड

Mahad Illegal Tree Cutting: महाड तालुक्यात बेकायदा वृक्षतोड; लाखो रुपयांच्या लाकडांची विनापरवाना विक्री

स्थानिक नागरिकांकडून वन विभागाकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

महाड: दक्षिण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात विन्हेरे विभागाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात विनापरवाना झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वन विभागाकडे केली आहे.

याप्रकरणी नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात असून मागील पंधरा ते वीस दिवसांत प्रचंड प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येऊन लाखो रुपयांचा "किटा लाकडाची" विनापरवाना विक्री केली असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

शासनाने मे महिन्यापासून ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत सह्याद्री पर्वत रांगातील झाडे तोडण्यास परवानगी देऊ नये व विनापरवाना झाडे तोडत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महाड तालुक्यात या आदेशाची पायमल्ली केली जात असुन आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे उघड झाले आहे.

तालुक्यातील विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात प्रसिद्ध असलेल्या विन्हेरे परिसरातील हद्दीमध्ये हजारो वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात येऊन परिसरात बेकादेशीर कत्तल केलेल्या लाकडांचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तोडलेल्या झाडांपासून किटा तयार करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून गेल्या पंधरा दिवसात दहा ते पंधरा ट्रक भरून किटा लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली असल्याचे समजते, झाडांची कत्तल व बेकायदेशीर किटांची वाहतूक होऊ नये यासाठी वनविभागाने वनरक्षकाची नेमणूक केली आहे.

पोलिसांचे गस्त पथक देखील त्या परिसरात नेमण्यात आले आहे, परंतु त्यांच्या कडून कोणत्या स्वरूपाची कारवाई अथवा माहिती वरिष्ठांकडे दिली जाते हे जाहीर करावे अशी वनप्रेमींची मागणी आहे.

महाड, पोलादपूर ,श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव या दक्षिण रायगड मधील सह्याद्रीच्या पर्वतरांगातून प्रचंड प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येऊन त्यापासून कीटा लाकूड तयार करण्यात येते. झाडांची कत्तल करताना कोणत्याही स्वरूपाचे प्रमाण, मोजमाप, तपासणी केली जात नाही. मागील पन्नास वर्षात ६० टक्के पेक्षा अधिक झाडांची कत्तल झाली आहे. त्याचा गंभीर परिणाम पर्यावरण तापमानावर होत असल्याचा अनुभव मिळत आहे.

लाकडांचा अवैध साठा जप्त करण्याची मागणी

पांगरी शिंगर कोंड येथील गावदेवी मंदिरा जवळ असलेला बेकायदेशीर लाकडाचा साठा जप्त करण्यात यावा, याबाबत सखोल चौकशी करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

वृक्षतोड बेकायदेशीर असल्यास कठोर कारवाई

करणार -वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील महाड तालुक्याच्या विन्हेरे विभागात झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्यासंदर्भात यापूर्वी प्राप्त झालेल्या प्रकरणाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून आज प्राप्त झालेल्या तक्रारीची शहानिशा करून पंचनामा करण्यासाठी त्या परिसरातील अधिकाऱ्याला नियुक्त केल्याची स्पष्ट करून गैरपद्धतीने वृक्षतोड झाल्या असल्यास त्यांच्या विरोधात वनखात्याच्या कायद्यानिहाय कारवाई केली जाईल, असे महाड वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT